पुणे, ३० एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बहुचर्चित सभा १ मे या दिवशी संभाजीनगर येथे होत आहे. या सभेसाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे येथून संभाजीनगर येथे रवाना होत आहेत. त्यापूर्वी राज ठाकरे यांना पुण्यातील पुरोहितांनी तिलक लावून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक पुरोहित राज ठाकरे यांच्या राजमहाल या निवासस्थानी आले होते. पुरोहितांनी शंख वाजवून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही मंत्रांचे १५ मिनिटे पठण केले. वेदमंत्र पठण चालू असतांना राज ठाकरे यांनी महाआरती केली.
हा सोहळा झाल्यावर राज ठाकरे यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते संभाजीनगर येथे रवाना झाले. काही प्रसिद्धीमाध्यमांनी याचे वृत्त देतांना ‘हिंदू जननायक’ अशी उपाधी दिली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी वातावरण सिद्ध केले असून येथील सभेला पुणे येथून १० ते १५ सहस्रजण जातील, अशी अपेक्षा मनसेचे पदाधिकारी अजय शिंदे यांनी व्यक्त केली.