जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !

नवी देहली – जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या जंगलाविषयी ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ग्लोबल फॉरेस्ट वॉच’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

१. गेल्या वर्षी ३८ लाख हेक्टर उष्णकटीबंधीय जंगल जगभरात नष्ट झालेले पहायला मिळाले. जंगल नष्ट होण्याचे हे प्रमाण वर्ष २०२० च्या तुलनेत ११ टक्क्यांनी अल्प आहे.

२. जगात सर्वाधिक वने ब्राझिलमध्ये आहेत. तेथे जंगलांचे नष्ट होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण १५ लाख हेक्टर जंगल तेथे नष्ट झाले आहे. जगात नष्ट झालेल्या एकूण जंगलांपैकी हे ४० टक्के जंगल होते.

३. दुसर्‍या स्थानी रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये नामशेष जंगलाच्या तुलनेत हे ३ पट अधिक आहे. ब्राझिलमध्ये आग न लागता नामशेष होत असलेल्या झाडांच्या संख्येतदेखील ९ टक्क्यांनी घट झाली आहे. अ‍ॅमेझॉन जंगलांतील ही घट वर्ष २००६ नंतर सर्वाधिक आहे. अशीच परिस्थिती जगातील उत्तरेकडील जंगलातही दिसून आली; परंतु उष्ण कटीबंधीय जंगलांच्या उलट उत्तरेकडील वने पुन्हा बहरू लागतात.

४. अ‍ॅमेझॉन जंगलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या अ‍ॅमेझॉन अतिशय गंभीर अशा वळणावर येऊन ठेपले आहे, अशी चेतावणी संशोधकांनी दिली आहे.

५. उष्ण कटीबंधीय जंगले नष्ट झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीचे हे प्रमाण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाएवढे आहे. वन क्षेत्राविषयी केलेल्या एका नव्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.