धुळे – राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या ४ जणांना आग्रा महामार्गावर गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी २७ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि १ खंजीर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जालना येथील ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळे येथे येणारी संशयास्पद चारचाकी गाडी दृष्टीस पडली. पोलिसांनी चारचाकीसह अनुमाने ७ लाख १३ सहस्र ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी महमंद शरीफ महमंद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल दाभाडे या ४ जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम १८४ आणि २३९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट ! – राम कदम, आमदार, भाजप
धुळे येथे ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणाहून धुळे येथे तलवारी आल्या आहेत. जालना येथे तलवारी पाठवण्यात येणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला ? कुणाला दंगल घडवायची आहे ? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत ? या प्रकरणाचे खोलवर अन्वेषण केले पाहिजे. सरकार ही चौकशी करणार का ?
संपादकीय भूमिकाराज्यात होणारी संभाव्य घातपाताची परिस्थिती रोखण्यास सरकार काय करणार ? |