व्यवस्थितपणा, अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असलेले सनातनचे १०७ वे समष्टी संत अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद !

‘अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांची चैत्र अमावास्या (३०.४.२०२२) या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्या चरणी प्रथम पुण्यतिथीनिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. व्यवस्थितपणा

सौ. क्षिप्रा जुवेकर

१ अ. घर आणि अधिकोष यांविषयीची सर्व महत्त्वाची कागदपत्रे धारिकेत लावून व्यवस्थित कपाटात ठेवलेली असल्याने वडिलांच्या निधनानंतर कागदपत्रांच्या संदर्भात कोणतीही अडचण न येणे : पू. बाबांच्या निधनानंतर काही व्यावहारिक कामे पूर्ण करायची होती, उदा. घराचा मालकीहक्क हस्तांतरित करणे, अधिकोषांची कामे इत्यादी. तेव्हा या विषयीच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या धारिका पू. बाबांनी त्यांच्या अभ्यासिकेच्या कपाटात व्यवस्थितपणे ठेवल्या होत्या. वर्ष १९९९ मध्ये केलेल्या घराच्या खरेदीपत्राचे लहान-सहान कागदसुद्धा धारिकेत व्यवस्थित लावलेले होते. त्यामुळे कागदपत्रांच्या संदर्भात आम्हाला कोणतीही अडचण आली नाही.

१ आ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात त्यांचे रक्ताच्या कर्करोगावरील उपचार चालू होते. तेव्हा त्यांनी वैद्यकीय उपचारासंबंधीची प्रत्येक पावती, देयक, ‘प्रिस्क्रिप्शन’, यांची धारिका बनवून अतिशय चांगल्या प्रकारे ठेवली होती.

१ इ. स्वतःची औषधे घेण्याच्या वेळा कागदावर लिहून ठेवलेल्या असल्याने सेवा करणाऱ्या साधकांना अडचण न येणे : त्यांचा आजार वाढला आणि त्यांच्या शारीरिक समस्या वाढू लागल्या. तेव्हा त्यांची सेवा करणाऱ्या साधकांना अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी ‘एका कागदावर कोणते औषध कोणत्या वारी, किती मात्रेत आणि केव्हा घ्यायचे आहे’, ही सर्व माहिती लिहून ठेवली होती.

२. महाविद्यालयातील वातावरण अत्यंत वाईट असूनही बाबांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवणे, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याविषयी आदरभाव असणे

काही वर्षांपूर्वी शिक्षणव्यवस्थेची अत्यंत दयनीय अवस्था असणाऱ्या एका महाविद्यालयात पू. बाबा प्राध्यापकाची चाकरी करत होते. तेथे ‘सर्वत्र अनुकृती (कॉपी) करून उत्तीर्ण होणे, वशिला लावून उत्तीर्ण होणे किंवा शिक्षकांशी गुंडगिरी करून गुण वाढवून घेणे’, असे अनेक वाईट प्रकार चालत होते. महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक बहुतेक केवळ नावापुरते महाविद्यालयात येत असत. अशा दूषित वातावरणातही पू. बाबा महाविद्यालयात शिकवण्यापूर्वी अनेक पुस्तके वाचून त्यातील टिपणे (नोट्स) काढत होते. पूर्ण विषयाचा अभ्यास करून नंतरच ते वर्गात शिकवत होते. त्यामुळे केवळ पू. बाबांच्या वर्गातच शिकण्यासाठी विद्यार्थी येत होते. त्यांच्या वर्गात ४० ते ५० विद्यार्थी असायचे. पू. बाबांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी शिकवलेले विद्यार्थी नेहमी त्यांची आठवण काढतात. त्यांच्याविषयी अत्यंत आदरभाव ठेवतात. यातून ‘आपण आपले कर्म प्रामाणिकपणे केले, तर समाजात परिवर्तन होते आणि त्यातून आपली साधनाही होते’, हे मला शिकायला मिळाले.

३. संशोधन करणाऱ्या आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना संपूर्णपणे साहाय्य करणे

पू. बाबा ‘पी.एच्.डी.’च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. अनेक वेळा विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी आमच्या घरीच रहावे लागत असे; कारण संशोधन कार्य लिहिणे, समजून घेणे इत्यादीसाठी अनेक घंटे लागायचे आणि पू. बाबांच्या मार्गदर्शनाखाली ‘पी.एच्.डी.’ करणारे अनेक विद्यार्थी दूरच्या गावांतून येत असत. असे संशोधन करणारे विद्यार्थी आमच्या घरीच २ – ३ दिवस राहून अभ्यास करायचे. या कालावधीत पू. बाबा त्यांची पुष्कळ काळजी घ्यायचे. त्यांचे भोजन आणि रहाण्याची व्यवस्था ते चांगल्या प्रकारे करत होते. त्या वेळी आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. त्यामुळे सुविधा अत्यल्प होत्या. तरीही पू. बाबांचे इतरांप्रती निरपेक्ष प्रेम असल्यामुळे संशोधन करणाऱ्या आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना पू. बाबा संपूर्णपणे साहाय्य करत होते.

४. समाजातील व्यक्तींचीही श्रद्धा असणे

अ. वर्ष २०२१ मध्ये पू. बाबांच्या देहत्यागानंतर आम्ही त्यांच्या महाविद्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा पू. बाबांनी शिकवलेले आणि पी.एच्.डी. केलेले एक प्राध्यापक आम्हाला म्हणाले, ‘‘पू. बाबांनी त्यांना पुष्कळ साहाय्य केले आहे. त्यांचे एखादे काम व्हावे, यासाठी मी कोणत्याही कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करीन. माझी त्यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.’’

आ. ‘ते अधिकोषात जायचे, तेथील कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्याप्रती अत्यंत आदरभाव आहे’, हे आम्ही अनुभवले.

५. अनुभूती

आजही पू. बाबांनी वापरलेल्या वस्तूंना सुगंध येतो. त्यांनी लिहिलेल्या दैनंदिनीच्या वह्या (डायरी) चैतन्यदायी वाटतात.

‘पू. बाबांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार. श्रीगुरूंना प्रार्थना करते की, ‘पू. बाबांचे गुण आमच्यामध्येही यावेत आणि आमचेही जीवन श्रीगुरुचरणी समर्पित व्हावे.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (३.४.२०२२)


डॉ. नंदकिशोर वेद संत होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

श्री. प्रकाश करंदीकर

१. डॉ. नंदकिशोर वेद यांचे देहावसान झाल्याचे समजल्यावर ‘त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असावी’, असा विचार मनात येणे : ‘११.५.२०२१ या रात्री १ वाजता मला सनातन पुरोहित पाठशाळेतून श्री. अमर जोशी यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी ‘श्री. नंदकिशोर वेदकाका यांनी देह ठेवला’, असे सांगितले. श्री. नंदकिशोर वेद यांचे देहावसान झाल्याचे कळले, तेव्हा ‘त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असावी’, असा विचार माझ्या मनात आला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ऑनलाईन कार्यक्रमात दाखवलेल्या ध्वनीचित्र-चकतीत डॉ. वेद यांना पाहून ‘त्यांनी संतपद गाठले असेल’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ऑनलाईन कार्यक्रमात दाखवलेल्या ध्वनीचित्र-चकतीत गुरुदेवांनी उपस्थित साधकांना ‘वेदकाकांकडे पाहून काय जाणवते ?’, असे विचारले होते. मला त्याच क्षणी ‘काकांनी संतपद गाठले असेल’, असे वाटले होते. त्यांच्याकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्यांच्या बोलण्यातून गुरूंप्रती श्रद्धा आणि भाव पदोपदी लक्षात येत होता. ते इतके दिवस रुग्णाईत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावरून तसे जराही जाणवत नव्हते. त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद, समाधान आणि कृतज्ञताभाव दिसत होता. ‘गुरुदेव साधकांना कसे घडवत आहेत !’, हे पाहून माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली.’

– श्री. प्रकाश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्याविषयीचे लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/575433.html