आपल्या संत-मातेची, पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची सेवा करतांना सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. आजींच्या देहत्यागानंतर लक्षात आलेली सूत्रे

सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची वैशाख शुक्ल प्रतिपदा (रविवार, १ मे २०२२)  या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांची धाकटी मुलगी सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

२३.४.२०१९ या दिवशी माझ्या आई, म्हणजे पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी संतपदावर आरूढ झाल्या. मे २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित केलेल्या श्री विष्णुयागाच्या दिवशी त्या रामनाथी येथील सनातच्या आश्रमात रहायला आल्या होत्या. १२.५.२०२१ या दिवशी (वैशाख शुक्ल प्रतिपदा या तिथीला) त्यांनी देहत्याग केला. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्ष होते. मी दीड वर्ष त्यांच्या सेवेत होते. सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (कै.) (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकर आजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त नमस्कार !


१. पू. आजींना एका डोळ्याने दिसत नसतांनाही वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे

पू. आईंचे शिक्षण केवळ मराठी चौथीपर्यंत झाले होते. त्यांना जन्मतःच एका डोळ्याने दिसत नव्हते आणि त्यांच्या दुसऱ्या डोळ्याचे शस्त्रकर्म झाले होते. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करायच्या. एका साधकाने पू. आईंच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्त एक कविता केली होती. साधकाने कवितेचा कागद पू. आईंच्या हातात दिल्यावर त्यांनी ती कविता न अडखळता वाचून दाखवली.

२. प्रीती

पू. आईंना कुणी भेटायला आल्यास त्या त्यांना आवर्जून खाऊ द्यायच्या आणि त्यांना पुन्हा यायला सांगायच्या.

सौ. अनुराधा पुरोहित

३. इतरांचा विचार करून सतत परेच्छेने वागणाऱ्या पू. माईणकरआजी !

अ. पू. आई अंघोळ करणे, कपडे घालणे, महाप्रसाद आणि औषध घेणे, अशा सर्व कृती करतांना परेच्छेने वागायच्या. पहिल्यापासून त्यांना साडी नेसायची सवय होती; पण नंतरच्या काही दिवसांत त्यांना साडी नेसवणे पुष्कळ कठीण होत होते. त्यामुळे मी त्यांना ‘गाऊन’ घालायला सांगायचे. ते त्यांनी स्वीकारले.

आ. त्यांना पुष्कळ थकवा असायचा; पण आम्ही सांगायचो, त्यामुळे त्या अंघोळ करायच्या. काही वेळा त्यांना १०३ – १०४ अंश फॅ. ताप असायचा. तशा स्थितीतही मी आणि आश्रमातील साधिका कु. गुलाबी धुरी त्यांचे शरीर पाण्याने पुसायचो. त्यांना एवढा ताप असतांनाही त्या काहीच बोलायच्या नाहीत.

इ. त्यांना हृदयविकाराच्या त्रासासाठी औषधे घ्यावी लागायची. ती घेणे त्यांना पुष्कळ त्रासदायक होत होते. असे असतांनाही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केवळ परेच्छा म्हणून औषधे घेतली.

ई. देहत्याग करण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांना अन्न-पाणी ग्रहण करायला पुष्कळ त्रास होत होता; पण परेच्छा म्हणून त्या खाण्याचा प्रयत्न करायच्या.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर पू. आजींना पुष्कळ आनंद होणे आणि गुरुदेवांनी साधिकेला ‘आजपासून पू. आजी तुमच्या गुरु अन् तुम्ही त्यांच्या शिष्या’, असे सांगून २४ घंटे त्यांच्यासमवेत रहाण्यास सांगणे : पू. आईंच्या ९० व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्या वेळी पू. आईंना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मी आणि कु. सोनल जोशीही तेथे होतो. (कु. सोनल ही पू. आजींची नात, म्हणजे मोठ्या मुलीची मुलगी असून तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.) गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आजपासून पू. आजी तुमच्या गुरु आणि तुम्ही त्यांच्या शिष्या ! आजी तुम्हाला जे सांगतात, ते तुम्ही ऐकायचे. तुम्ही २४ घंटे पू. आजींच्या समवेत रहायचे !’’

४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची विनम्रता आणि अहंशून्य वृत्ती ! : पू. आई वयाने मोठ्या असल्याने गुरुदेवांनी खोलीत आल्यावर आणि खोलीतून निघतांना पू. आईंच्या चरणांना हात लावून त्यांना नमस्कार केला. तो क्षण पहाण्यासारखा होता. पू. आई गुरुदेवांना स्वतःच्या चरणांना हात लावू देत नव्हत्या; पण शेवटी गुरुदेवांनी पू. आईंना नमस्कार केला.

४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजींसाठी साड्या पाठवल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होणे : पू. आई ‘गुरुदेव माझे वडील आहेत’, असे नेहमी म्हणायच्या. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आईंसाठी साड्या पाठवल्या होत्या. त्या साड्या पाहून पू. आईंना पुष्कळ आनंद झाला. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेव माझ्यावर एवढी माया का करतात ?’’ तेव्हा सोनल पू. आईंना म्हणाली, ‘‘अगं, ते तुझे वडील आहेत ना, म्हणून.’’ तेव्हा पू. आई पुष्कळ हसल्या.

४ ई. पू. आजींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मिळालेल्या आश्रमातील खोलीविषयी सर्वांना आनंदाने आणि कृतज्ञताभावाने सांगणे अन् साधिकेला ‘तू मला सोडून कुठेही जायचे नाहीस’, असे सांगणे : पू. आई आश्रमात त्या रहात असलेल्या खोलीविषयी सर्वांना आनंदाने सांगायच्या, ‘‘ही खोली परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला मिळाली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, ‘‘आता इथेच रहायचे. इथून कुठेच जायचे नाही.’’ पू. आई मला म्हणायच्या, ‘‘तू मला सोडून कुठेही जायचे नाहीस. तू खोलीत आलीस की, मला लक्ष्मी आल्यासारखी वाटते.’’ एकदा पू. आई मला म्हणाल्या, ‘‘तुला आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांनी खोली दिली, ते चांगले झाले. आपल्या दोघींचा संसार पुष्कळ चांगला चालला आहे. आता मला आणखी काही नको.’’

४ उ. साधिकेने परात्पर गुरु डॉक्टरांना ‘परम पूज्य, तुमची शबरी जेवायला बसली आहे, आता तुम्हीच तिला भरवा’, अशी प्रार्थना केल्यावर पू. आजींनी थोडा महाप्रसाद ग्रहण करणे : पू. आईंना शेवटी शेवटी अन्न नकोसे झाले होते. तेव्हा मी आणि कु. गुलाबी धुरी त्यांना शबरीचे चलत्चित्र (‘व्हिडिओ’) दाखवायचो किंवा श्रीरामाची गाणी ऐकवायचो. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करायचे, ‘परम पूज्य, तुमची ‘शबरी’ जेवायला बसली आहे. आता तुम्हीच तिला भरवा !’ तेव्हा पू. आई थोडासा महाप्रसाद ग्रहण करायच्या.

५. साधिकेचे पू. आईंशी झालेले संभाषण

पू. आई : अगं, मी अजून किती दिवस जगणार ?

मी : हा तुमचा शेवटचा जन्म आहे. आता तुम्ही परत पृथ्वीवर येणार नाही. आता यापुढे काहीच भोगायचे नाही. गुरुमाऊलींच्या कृपेने तुम्हाला जनलोकात स्थान प्राप्त झाले आहे. जनलोकात गेल्यावर तुम्ही काय करणार ?

पू. आई : मी तुझी वाट बघणार.

मी : म्हणजे मला संत व्हावे लागेल.

पू. आई : हो.

६. पू. आजींच्या देहात झालेले पालट

अ. पू. आईंच्या कपाळाची त्वचा गुलाबी झाली होती. त्यांच्या तोंडवळ्यावरील त्वचा गुलाबी आणि नितळ वाटत होती. त्यांचे हात-पाय गुलाबी आणि गुळगुळीत झाले होते.

आ. त्यांच्या कपाळावर बिल्वपत्रासारखी आकृती उमटली होती. त्यांच्या हातावर आणि पायावर ‘ॐ’ उमटला होता.

इ. त्यांचे केस काळे झाले होते आणि डोळेही पाणीदार झाले होते.

७. पू. आईंचे बोलणे न्यून झाले होते. ‘त्या शून्यात एकटक पहात आहेत’, असे वाटायचे.

८. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने पू. आजींनी काही वेळा सूक्ष्मातून दिसणाऱ्या दृश्यांविषयी सांगणे आणि सनातनची उदबत्ती लावून विभूती फुंकरल्यावर त्यांना दृश्ये दिसणे बंद होणे

पू. आई सूक्ष्मातून त्यांना जे काही जाणवायचे, त्याविषयी मला सांगायच्या. त्या म्हणायच्या, ‘‘तिथे मांजर आहे. तिथे कुणीतरी उभे आहे आणि पटलाजवळ लहान मुलाला घेऊन बसले आहे.’’ याविषयी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ही काहीतरी सूक्ष्म प्रक्रिया आहे.’’ पू. आईंनी असे सांगितल्यावर मी खोलीत सनातनची सात्त्विक उदबत्ती लावून चारही बाजूंनी तिची विभूती फुंकरायचे आणि पू. आईंना विचारायचे, ‘‘आता कोणी दिसत आहे का ?’’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘आता मला कोणी दिसत नाही.’’ मला मात्र शेवटपर्यंत याविषयी (सूक्ष्मातील) काही कळायचे नाही.

९. पू. आजींचा देहत्याग

९ अ. ‘पू. आजींना देहत्यागाची पूर्वसूचना मिळाली असावी’, असे साधिकेला वाटणे : पू. आई मला म्हणायच्या, ‘‘तू माझ्या शेजारी बस. माझ्या शेजारी झोप. मला तुला पहायचे आहे.’’ एरव्ही पू. आईंना कुणीही त्यांच्या शेजारी झोपलेले आवडायचे नाही. त्यांच्या या बोलण्यावरून मला वाटायचे, ‘पू. आईंना त्यांच्या देहत्यागाची वेळ जवळ आली आहे’, हे कळले होते.

९ आ. पू. आजींची स्थिती पाहून ‘त्या लवकरच देहत्याग करतील’, असे साधिकेच्या मनात येणे : पू. आईंनी शेवटच्या ४ दिवसांत बोलणे आणि खाणे-पिणेही बंद केले होते. त्या केवळ ‘इलेक्ट्रॉल पावडर’चे पाणी प्यायच्या. नंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. आधुनिक वैद्यांनी पू. आईंना तपासले आणि मला सांगितले, ‘‘त्यांची प्रकृती पुष्कळ गंभीर आहे. काही सांगता येत नाही.’’ पू. आईंची स्थिती बघून मला आतून जाणवत होते, ‘पू. आई लवकरच देहत्याग करतील !’

९ इ. पू. आजींनी देहत्याग केल्यावर साधिकेला शांत आणि स्थिर रहाता येणे आणि देहत्यागानंतर पू. आईंचा तोंडवळा चांगला वाटणे : १२.५.२०२१ या दिवशी पू. आईंनी देहत्याग केला. रुग्णालयात मी आणि कु. गुलाबी धुरी पू. आईंच्या पार्थिवाजवळ बसलो होतो. जसा वेळ जात होता, तसा पू. आईंचा तोंडवळा चांगला वाटत होता. एरव्ही मृत्यूच्या प्रसंगी नातेवाइकांचे रडणे चालू होते; पण देवाने मला आणि सहसाधिकेला शांत अन् स्थिर ठेवले. सकाळी आम्ही पू. आईंना घेऊन रामनाथी आश्रमात आलो.

९ ई. पू. आजींची अंतिम विधीसाठी सिद्धता करतांना ‘त्या जिवंत असून शांत झोपल्या आहेत आणि पुष्कळ आनंदी आहेत’, असे वाटणे : आम्हाला अंतिम विधीसाठी पू. आईंची सिद्धता करायची होती. यापूर्वी मी अशी कृती कधीही केली नव्हती. त्यामुळे आरंभी ‘देवा, मी हे सर्व कसे करू ?’, असा विचार माझ्या मनात आला. नंतर देवाने सर्व सिद्धता करण्याचे बळ दिले. मी आणि सहसाधिकेने मिळून सर्व सिद्धता केली. तेव्हा मला जाणवत होते, ‘पू. आई जिवंत आहेत आणि मी त्यांचे आवरून देत आहे.’ आवरल्यावर पू. आई पुष्कळ चांगल्या दिसत होत्या. तेव्हा ‘त्या शांत झोपल्या असून पुष्कळ आनंदी आहेत’, असे मला वाटत होते. हे सर्व करत असतांना मला आतून शांत वाटत होते.

९ उ. आश्रमातील साधक पू. आजींचे दर्शन घेत होते. त्या वेळी साधकांना ‘पू. आजी शांत झोपल्या आहेत’, असे वाटत होते.

९ ऊ. देहत्यागानंतर पू. आजींच्या देहात जाणवलेले पालट ! : पू. आईंचा देहत्याग होऊन ८ – ९ घंटे उलटून गेले होते, तरी त्यांचे शरीर ताठ न होता पुष्कळ लवचिक वाटत होते. पू. आईंचा संपूर्ण देह पांढरट पिवळा दिसत होता.

९ ए. पू. आजींचे पार्थिव नेत असतांना तुकाराम महाराज यांचा ‘आम्ही जातो आमुच्या गांवा, आमुचा रामराम घ्यावा ।’ हा अभंग आठवणे : आश्रमातून पू. आईंचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेतांना आकाशात ढग जमा झाले होते. त्या वेळी ‘पाऊस पडेल’, असे वाटत होते; परंतु पाऊस आला नाही. पू. आईंना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातांना मला तुकाराम महाराज यांचा अभंग आठवला, ‘आम्ही जातो आमुच्या गांवा, आमुचा रामराम घ्यावा ।’ ‘तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले’, याची मला आठवण झाली. शेवटपर्यंत पू. आईंचा कुणाला कसलाच त्रास झाला नाही. त्यांनी शांतपणे जनलोकात प्रस्थान केले. आता मला जेव्हा पू. आईंची आठवण येते, तेव्हा त्या पुष्कळ आनंदी असल्याचे जाणवते.

या सर्व प्रसंगांत देवाने मला पुष्कळ शांत आणि स्थिर ठेवले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही या सर्व प्रसंगांत स्थिर होता. तुमची सेवा ईश्वरचरणी पोचली.’’

एरवी मी अशा कठीण प्रसंगांत कोलमडून गेले असते; पण प.पू. गुरुदेव, केवळ आणि केवळ तुमच्या कृपेने या जिवाकडून ही सेवा घडली. या सेवेत माझ्याकडून चुकाही झाल्या. त्याबद्दल मला क्षमा करावी. देवा, तू माझ्याकडून ही सेवा करवून घेतलीस, त्यासाठी हा असमर्थ जीव तुझ्या आणि पू. आईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

– सौ. अनुराधा पुरोहित (पू. माईणकरआजींची धाकटी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक