‘अमुक वार मला शुभ आहे’, ‘अमुक वार माझा घातवार आहे’, अशी वाक्ये आपण बऱ्याच जणांच्या तोंडी ऐकत असतो. वार आणि त्यांचे महत्त्व काय ? याविषयी जाणून घेऊया.
१. रविवार
‘रविवारचे महत्त्व शाही कामांसाठी महत्त्वाचे मानले गेले आहे. या दिवशी भव्य समारंभ, राज्याभिषेक, लाभप्राप्तीसाठी पूजापाठ करणे इष्ट मानले जाते. रविवारी सोने, तांबे यासारख्या बहुमुल्य धातूंची खरेदी करावी. यादिवशी पशुधन गाय, बैल, बकरी यांची खरेदीही लाभदायी ठरते. हवाई प्रवास आणि आरोग्यप्राप्तीसाठी औषध सेवन यांसाठीही हा वार फलदायी ठरतो.
२. सोमवार
विद्या अध्ययनासंबंधी कार्य या दिवशी करावे. नवे कपडे, आभूषणे या दिवशी महिलांनी धारण केल्यामुळे परमसौभाग्य प्राप्त होते. विहीर खोदणे, पाट काढणे, तलाव खोदणे ही जलसंबंधी कामे या दिवशी चालू करावीत.
३. मंगळवार
या दिवशी सैन्यदलाचा आरंभ किंवा वाढ ही मंगळवारी करणे इष्ट ठरते. अग्निपूजा मंगळवारी केल्याने भाग्योदय होतो.
४. बुधवार
नव्या कामाचा आरंभ या वारी करणे विशेष शुभ ठरते. नोकरीचा श्रीगणेशा, शिल्प, कला क्षेत्रातील आपल्या कलेचे प्रदर्शन या दिवशी केल्याने लोक आकर्षित होतात. व्यापार अध्ययनामध्ये चालू होणारे नवे उपक्रम या दिवशी चालू करावेत.
५. गुरुवार
धार्मिक कार्ये, अनुष्ठान यांच्या प्रारंभासाठी हा वार अत्यंत शुभ मानला जातो. यज्ञ, घर बांधकाम, मंगलकार्ये, विद्या अध्ययन, प्रवासाचा आरंभ यासाठीही हा दिवस सर्वांत शुभ ठरतो.
६. शुक्रवार
स्त्रियांसाठी हा वार फार महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भूमीखरेदी, व्यापार आरंभ, कृषीविषयक कार्याचा मुहूर्त केल्याने लाभ होतात. संपत्ती आणि निधीसाठीचे नवे स्रोत या दिवशी चालू करणे इष्ट ठरते. स्त्रियांना आभूषण धारणा करण्यासाठी हा शुभ वार आहे.
७. शनिवार
दीक्षा घेणे यासारखी महत्त्वाची कामे या दिवशी केल्याने भाग्योदय होतो. लोहसंबंधी कामे या दिवशी करावीत, त्यामुळे लाभ होईल. गृहप्रवेश, पाळीव प्राण्यांना प्रशिक्षण देणे या कामांसाठीही हा दिवस शुभ ठरतो. शनीदेवाची विधीवत् पूजा केल्याने लाभ होतो.’
(साभार : मासिक ‘श्रीमत् पूर्णानंदाय नमः’, दिवाळी विशेषांक २०१४)