अपुऱ्या कामांच्या पार्श्वभूमीवर महाड (जिल्हा रायगड) येथील ‘पूर निवारण समिती’चा निर्णय !
रायगड – महाड-पोलादपूर येथे महापुरानंतर पूर निवारणासाठी व्यापक कामे हाती घेण्याचे नियोजन झाले होते. पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात आला; मात्र दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याची कामे चालू झालेली नाहीत. वारंवार अर्ज किंवा विनंती करूनही सीआर्झेडची अनुमती मिळालेली नाही. ३० एप्रिलला या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आम्ही मुंबई-गोवा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहोत, अशी माहिती महाड येथील पूर निवारण समितीचे संघटक नितीन पावले यांनी दिली.
१. वर्ष २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळ, तर २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळ यांचा जिल्ह्याला सामना करावा लागला. जुलै २०२१ मध्ये महापूर आणि भूस्खलन झाले. त्यात ९० हून अधिका जणांचा मृत्यू झाला. त्या वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने घोषणा करण्यात आल्या; पण आता वर्ष २०२२ चा पावसाळा जवळ येऊनही प्रत्यक्ष कामे मार्गी लागलेली नाहीत.
२. राज्य सरकारकडून तळीये ग्रामस्थांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यासाठी त्यांना म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधून दिली जाणार होती; पण अजून घरांचे बांधकामच चालू करण्यात आलेले नाही.
३. आपत्ती काळात रक्षणासाठी महाड येथे एन्.डी.आर्.एफ.चा ‘बेस कँम्प’ उभारण्यात येणार होता; पण त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाला संमतीच मिळालेली नाही.
संपादकीय भूमिकाआंदोलन करण्याची वेळच का येते ? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ही कामे नियोजनबद्धरित्या का करत नाही ? यंत्रणेतील कर्तव्यचुकार अधिकाऱ्यांना वेळीच खडसवायला हवे ! |