भंडारा येथे रेती तस्करांचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर आक्रमण !

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड घायाळ !

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड

भंडारा – येथे कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एस्.डी.ओ.) पथकावर रेती तस्करांनी आक्रमण केले. ही घटना २७ एप्रिल या दिवशी पहाटे ३.३० वाजता घडली. यात उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड घायाळ झाले असून त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जिल्ह्यातील पवनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. राठोड यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

रवींद्र राठोड यांना रेती तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पहाटे ३.३० वाजता रेतीचे ४-५ टिप्पर एकामागोमाग येत असतांना दिसल्यावर त्यांनी टिप्परला थांबवण्याची चेतावणी दिली; मात्र टिप्परचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर त्यांच्या पथकाने टिप्पर अडवला; पण काही कळायच्या आत १५-२० तस्करांनी हातात काठ्या आणि दगड घेऊन पथकावर आक्रमण केले. यानंतर तस्कर पसार झाले. २ दिवसांपूर्वी लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्करांनी लाठ्याकाठ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात २ तस्करांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवघेणे आक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या रेती तस्करांवर अद्यापपर्यंत कठोर कारवाई का होत नाही ? यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे कि पोलिसांवर दबाव आहे ? हे समजायला हवे. तस्करांवर कठोर कारवाई केल्यासच ते पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस करणार नाहीत !