‘न्यूज १८’चे पत्रकार अमन चोपडा यांच्यावर राजस्थानमध्ये २ गुन्हे नोंद

‘३०० वर्षे जुने शिवमंदिर पाडण्यामागे जहांगीरपुरीतील अवैध बांधकामांवरील कारवाईचा सूड आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केल्याने कारवाई

नवी देहली – हिंदी वृत्तवाहिनी ‘न्यूज १८’चे सूत्रसंचालक अमन चोपडा यांच्यावर राजस्थानमधील बुंदी आणि डुंगरपूर येथे २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगड येथे ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आली होती. याविषयी वृत्त प्रसारित करतांना चोपडा यांनी ‘देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा सूड घेण्यासाठी या मंदिरांवर कारवाई करण्यात आली आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावरून त्यांच्यावर हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या वृत्तातून त्यांनी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१.  तक्रारीत म्हटले आहे की, चोपडा यांनी त्यांच्या वृत्तात काँग्रेसचे नाव घेतले. त्यातून लक्षात येते की, त्यांचा उद्देश राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात लोकांमध्ये विद्रोह निर्माण करण्याचा होता. हे खोटे वृत्त प्रसारित करणे राजस्थान सरकारच्या विरोधातील एक षड्यंत्र आहे. याला देशद्रोहाचा गुन्हा मानला पाहिजे.

२. याविषयी भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका पत्रकाराच्या विरोधात नियोजनबद्ध आक्रमण हे लोकशाहीच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. अमन चोपडा यांना प्रश्‍न विचारू नका, तर त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर द्या.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात निष्पक्ष पत्रकारिता करणार्‍यांच्या विरोधात कारवाई होते. आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !