पुणे – गृहविभागाने राज्यातील आय.पी.एस्. अधिकार्यांच्या स्थानांतराचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार आय.पी.एस्. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून मावळते आयुक्त कृष्णप्रकाश यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई येथे स्थानांतर करण्यात आले आहे. दुसरीकडे संदीप कर्णिक यांची पुण्याचे नवीन पोलीस सहआयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली असून पुण्याचे विद्यमान सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यापूर्वी बृहन्मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते, तर त्यांची वर्णी आता पुण्याचे सहपोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरून विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्यासाठीच्या प्रक्रियेतून कर्णिक यांना पदोन्नती देण्यात आली आहे. संदीप कर्णिक यापूर्वी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतांनाच मावळमध्ये शेतकर्यांवर गोळीबार झाला होता. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर संदीप कर्णिक यांचे स्थानांतर करण्यात आले होते. संदीप कर्णिक आता पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.