संभाजीनगर येथे सामाजिक माध्यमांवर तेढ पसरवणाऱ्या ७०० पोस्ट ‘सायबर सेल’ने काढल्या !

संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी केलेल्या आवाहनानंतर सामाजिक माध्यमांवर दोन्ही बाजूंनी तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट तिपटीने वाढल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत राज्याच्या पोलीस विभागातील ‘सायबर सेल’ने अशा ७०० पोस्टवर कारवाई केली. कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण असल्याने त्या काढून घेण्यात आल्या. सामाजिक माध्यमांवरील २२ खाती बंद केली आहेत. गेल्या १५-२० दिवसांत भोंगे उतरवण्याला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्या पुष्कळ पोस्ट सामाजिक माध्यमांतून येत आहेत. अशा सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या पोस्टवर ‘सायबर सेल’ लक्ष ठेवून आहे.

३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

४ मासांत ४०० लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर ३०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद झाले आहेत. २ वर्षांत १२ सहस्र पोस्ट ओळखून त्या संबंधित आस्थापनांना पाठवण्यात आल्या. पैकी ६ सहस्र पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘सायबर सेल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.