देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

आदेश गुप्ता

नवी देहली – देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देहलीतील या ४० गावांच्या नावांमध्ये हुमायूंपूर, युसूफ सराय, मसूदपूर, जमरूदपूर, बेगमपूर, सैदुल अजाब, फतेहपुर बेरी, हौज खास, शेख शराय आदी नावांचा समावेश आहे.

१. गुप्ता पुढे म्हणाले की, कुणीही गुलामगिरीच्या मानसिकतेत राहू इच्छित नाही. ही नावे तेच दर्शवत आहेत. मला अनेक गावकर्‍यांनी नावे पालटण्याची मागणी करणारी निवेदने दिली आहेत. भाजपशासित दक्षिण देहली महापालिकेतील महंमदपूर गावाचे नाव पालटून माधवपूर करण्याचा प्रस्ताव संमत करून सरकारकडे पाठवला होता; मात्र देहली सरकारने अद्याप त्याला संमती दिलेली नाही.

२. याविषयी आम आदमी पक्षाने म्हटले आहे की, देहलीतील अशा प्रकरणांशी संबंधित ‘राज्य नामकरण प्राधिकरण’ आहे. जर नामांतराचा प्रस्ताव मिळाला, तर हे प्राधिकरण नियमानुसार समीक्षा करून कार्यवाही करील.

संपादकीय भूमिका

केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील गुलामीची दर्शक असणारी इस्लामी नावे पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी प्रयत्न केला पाहिजे !