आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असतांना वाईट शक्तींचे त्रास दूर होत नसतील, तेव्हा ध्यान लावून निर्गुण स्तरावर उपाय करा !

‘१२.३.२०२२ या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा मला दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, ‘‘एका संतांना पुष्कळ अस्वस्थ वाटत आहे, तसेच त्यांची प्राणशक्तीही पुष्कळ न्यून झाली आहे. त्या आणि मी प्रांतीय हिंदु अधिवेशनामध्ये सहभागी आहोत. त्यातील सेवेमुळे त्या संतांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय सध्या करता येणार नाहीत. तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपाय करू शकाल का ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मी त्यांच्यासाठी उपाय करतो. तुम्ही सेवा करा.’’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. उपाय शोधून त्याप्रमाणे न्यास आणि नामजप करत पाऊण घंटा उपाय करूनही त्या संतांच्या अनाहतचक्रामधील त्रासदायक शक्ती न्यून न होणे

मी त्या संतांना होणाऱ्या त्रासाचे कारण शोधले. त्यांच्या अनाहतचक्रामध्ये पुष्कळ त्रासदायक शक्ती (काळी शक्ती) होती. त्यांच्यासाठी मला ‘निर्गुण’ हा नामजप, तसेच ‘एका हाताचा तळवा डोळ्यांसमोर आणि दुसऱ्या हाताचा तळवा अनाहतचक्रावर ठेवणे’, असे उपाय मिळाले. मी त्याप्रमाणे त्यांच्यावर उपाय करू लागलो. प्रथम मी त्यांच्या चक्रांवरील त्रासदायक आवरण काढले आणि त्यानंतर मी त्यांना त्रास होत असणाऱ्या स्थानी न्यास करत नामजप करू लागलो. मी त्यांच्यासाठी पाऊण घंटा उपाय केले; पण तरीही त्यांच्या अनाहतचक्रामधील त्रासदायक शक्ती न्यून झाली नाही. त्यामुळे त्या संतांना अजूनही बरे वाटत नसल्याचा निरोप त्यांच्याकडून भ्रमणभाषवर आला.

२. देवाने अनाहतचक्रावर ध्यान करून उपाय करण्यास सुचवणे आणि तसे केल्यावर ३ मिनिटांतच लाभ होऊन त्रास ५० टक्के न्यून झाल्याचे त्या संतांनी कळवणे

तेव्हा देवाने मला सुचवले, ‘न्यास आणि नामजप न करता नुसते अनाहतचक्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान कर.’ त्याप्रमाणे मी ध्यान करू लागलो. तेव्हा लगेच ३ मिनिटांनी मला जाणवले, ‘त्या संतांच्या अनाहतचक्रामधील काळी शक्ती आता पुष्कळ अल्प झाली आहे.’ त्याच वेळी मला भ्रमणभाषवर त्या संतांचा निरोप आला, ‘५० टक्के फरक पडला आहे. अस्वस्थता न्यून झाली आहे; पण अजूनही प्राणशक्ती अल्प आहे.’

३. यावरून लक्षात आले, ‘वाईट शक्ती जेव्हा निर्गुण स्तरावर आक्रमण करत असतील, तेव्हा प्रत्यक्ष मुद्रा, न्यास आणि नामजप न करता काळ्या शक्तीने बाधित झालेल्या चक्रावर ध्यान लावून उपाय केल्यास लगेच परिणाम होतो; कारण तेव्हा आपले उपायसुद्धा निर्गुण स्तरावरील असतात.’

४. त्या संत हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण सेवा करत असल्याने ‘त्यांना ती सेवा करता येऊ नये’, यासाठी वाईट शक्तींनी त्यांच्यावर निर्गुण स्तरावर आक्रमण केले असणे

त्या संत हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसाठी जिज्ञासू, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अधिवेशन घेण्याची महत्त्वपूर्ण सेवा करत असल्याने ‘त्यांना ती सेवा करता येऊ नये’, यासाठी वाईट शक्तींनी पूर्ण जोर लावून त्यांच्यावर निर्गुण स्तरावर आक्रमण केले होते. ध्यान लावून निर्गुण स्तरावर उपाय करून हे आक्रमण दूर करता आले. त्यानंतर मी त्या संतांसाठी आणखी २० मिनिटे उपाय केल्यावर त्यांची अस्वस्थता पूर्णपणे दूर झाली, तसेच त्यांची प्राणशक्तीही वाढली.

‘त्या त्या वेळी देव कसा सुचवतो आणि तशी कृती करवून घेतो’, हे या प्रसंगावरून लक्षात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अशा नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळातात, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.३.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक