समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार !
मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – हिंदु धर्मातील कन्यादान विधीतील मंत्राची टिंगल केली, तशी अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य अमोल मिटकरी यांच्यात आहे का ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला आहे. कोल्हापूर येथील गांधीनगर पोलीस ठाण्यात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात २१ एप्रिल या दिवशी धर्मप्रेमी श्री. विक्रम चौगुले आणि श्री. अजित पाटील यांनी तक्रार केली आहे. या वेळी सर्वश्री राजू यादव, विराग करी, प्रकाश मुदुगडे, अनिल दळवी, श्रीकांत शिंदे, अजित(अप्पा) पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य निवास यमगर, ग्रामपंचायत सदस्य रमेश वाईंगडे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी भाषणात एका समाजघटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली आहे. दुर्दैवाने व्यासपीठ आणि त्यांच्यापुढे बसलेले बहुतांश लोक हे हिंदूच होते, तरीही मिटकरी यांच्या जात्यंध विधानाला सर्वजण हसून प्रतिसाद देत होते. एकीकडे भोंग्यांच्या विषयावर मुसलमान समाजाच्या भावना दुखावतात म्हणून या भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवणार्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल करून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्या, यातून अमोल मिटकरी यांना कोणत्या ‘व्होट बँके’ची चिंता आहे ? आणि कोणत्या ‘व्होट बँके’विषयी द्वेष आहे ? हे स्पष्ट दिसून येते.
हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा सहन केली जाणार नाही ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे जर समाजात तेढ निर्माण करणार्यांना साथ देत असतील, तर राज्यात सामाजिक न्याय टिकून राहील का ? आमदार मिटकरी यांनी ‘वाचा मौनस्य श्रेष्ठम्’, असे ट्वीट केले आहे. वास्तविक अशा प्रकारची वरवरची क्षमायाचना अपेक्षित नसून असे प्रकार राजकीय पक्षातील लोकांकडून वारंवार का होतात ? याचा विचार करायला हवा. संस्कृत श्लोकाचा आधार घेऊन मिटकरी अद्यापही क्षमा मागण्यास सिद्ध नाहीत. त्यांनी सार्वजनिकरित्या हिंदु समाजाची क्षमायाचना करावी.