उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची जोरदार मागणी
पणजी – उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा’, अशी जोरदार मागणी त्यांच्या भाषणात केली. गोव्यात मराठी भाषेवर अन्याय होता कामा नये आणि त्यासाठी कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी पुढाकार घ्यावा, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘आज जे कोकणी कोकणी करून मिरवतात आणि मराठीला हिणवतात, त्यांनी गोव्यात मडगावला वर्ष १९४५ मराठी साहित्य संमेलन भरवले होते. कोकणी ही मराठीची बोली आहे, असे आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवले होते; पण आम्ही अभ्यास केला तेव्हापण आम्हाला जाणवल की, ही मराठीची बोली आहे. न्यायालयाने दोन्ही भाषा गोव्यासाठी मान्य केल्या होत्या; पण कोकणी ही राजभाषा झाली आणि मराठीला डावलले गेले. त्या वेळच्या मराठी राजकारण्यांनीही मराठीचा बळी दिला. बहुसंख्यांकांची भाषा फेकून दिली. ‘कोकणीला आमचा विरोध नाही; पण मराठीला तुम्ही विरोध करू नका’, असे मी या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांना आवाहन करतो. तेथील आताचे राजकारणी जर मराठीचा द्वेष करत नसतील, तर मराठीला गोव्याची दुसरी राजभाषा म्हणून दर्जा द्यावा.’’