धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत होऊया ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

कळवंडे (चिपळूण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण, २१ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्‍वकल्याण होणार आहे. २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारलाही जात नव्हता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे सर्वांना त्याची भीती वाटत होती; मात्र आज ही स्थिती पालटली आहे. मुसलमानांना भारताचे ‘दार-उल-इस्लाम’ म्हणजे इस्लामीकरण करायचे आहे. ख्रिस्त्यांना भारताचे ‘ख्रिस्तीकरण’ करायचे आहे, तर साम्यवाद्यांना भारतात नास्तिकता वाद आणायचा आहे. यासाठी त्यांच्याकडून नियोजनपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. हिंदु मात्र स्वत:च्या धर्माचे श्रेष्ठत्व विसरून पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नव्हे, तर विकृतीच्या आहारी गेले आहेत. संख्येने हिंदूबहुल देश असतांनाही आपल्या राष्ट्रासमोर अशी आव्हाने उभी रहात आहेत. जन्महिंदू राष्ट्र, धर्म, संस्कृतीचे रक्षण करू शकत नाहीत, तर कर्महिंदूच ते करू शकतात, असे इतिहास सांगतो; म्हणून जन्महिंदूंना धर्मशिक्षण देऊन कर्महिंदू बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. त्याचा लाभ घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या ईश्‍वरी कार्याचे आपण भागीदार बनूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले. ते तालुक्यातील कळवंडे मारवाडी येथील सुकाईदेवी सभागृहात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते

श्री. सुरेश शिंदे

या सभेला माजी सरपंच रावजी उदेग, पोलीस पाटील अनंत उदेग, सर्वश्री गुरुनाथ उदेग, गावकार बाळाराम वरपे, गणेश वरपे, किशोर पांचाळ, हरिश्‍चंद्र नाचरे यांसह १२५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या सभेत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सचिन सकपाळ यांनी केले. समितीच्या वक्त्यांचे  स्वागत ह.भ.प. दीपक उदेग यांनी केले.

विशेष सहकार्य : दीपक साऊंड सर्व्हिसेसचे श्री. सोमा महादेव घोडमोडे यांनी व्यासपीठ स्पीकर व्यवस्था विनामूल्य केली.

अभिप्राय

१. श्री. प्रशांत प्रदीप उदेग आणि श्री. सुमित दीपक उदेग : हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि धर्मशिक्षण घेणे किती आवश्यक आहे ? हे सभेतून लक्षात आले.

२. कु. अक्षिता अनंत उदेग : धर्मासाठी नियमित कार्य करण्याची संधी मिळाली.

३. श्री. सौरभ संतोष उदेग : मी माझा वाढदिवस तिथीनुसार करणार. मी आजपासून ‘मम्मी’ आणि ‘पप्पा’ऐवजी ‘आई’ आणि ‘बाबा’ अशी हाक मारीन आणि प्रतिदिन टिळा लावीन.