मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये धमकावून खंडणी मागितल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर पोलिसांसह कारवाई करत तिला अटक केली आहे. रेणू शर्मा यांच्यावर इतर व्यक्तींनाही धमकावल्याच्या (ब्लॅकमेलिंग) तक्रारी विविध पोलीस ठाण्यात प्रविष्ट आहेत.
रेणू शर्मा या महिलेने जानेवारी २०२१ मध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा कथित आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिने ही तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील क्रमांक वापरून संदेश, ‘व्हॉट्सॲप’ तसेच भ्रमणभाष करून पैशांची मागणी करत आहे. या संदर्भातील पुरावे पोलिसांना दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
‘मागील दीड-दोन वर्षांपासून या गोष्टी मी सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट करावी लागली. आता यात जे काय करायचे, ते पोलीस करतील’, असे धनंजय मुंडे म्हणाले.