नाशिक – मी कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले आहेत. एकाही निर्णयाचा मला पश्चात्ताप नाही, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी २१ एप्रिल या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे. गृहविभागाकडून २१ एप्रिल या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्थानांतर आणि पदोन्नती यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील आय.पी.एस्. अधिकाऱ्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. यात येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार आहेत.
नाशिक शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम करतांना दीपक पांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखली. त्यांचे महिला अत्याचार प्रतिबंध विभागात त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.
ते म्हणाले, ‘‘नाशिक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सर्वांत पहिला गुन्हा नाशिक शहरात नोंद झाला होता. तेव्हा येथील पोलीस कोकणात पाठवले होते. नारायण राणे यांच्याविषयी येथे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला, तसेच महसूल विभागाविषयी पाठवलेल्या पत्रावर मी आजही ठाम आहे. भोंग्यांच्या संदर्भात नवा आदेश काढला, याविषयी कुणाला न्यायालयात जायचे असेल, तर त्यांनी जावे. पोलीस दलात २३ वर्षे सेवा केल्यानंतर आता समाजाला काही दिले नाही, तर कधी देणार ? निवृत्त झाल्यावर काही बोलण्यापेक्षा महत्त्वाच्या पदावर असतांना दृष्टीस आणून दिलेले कधीही योग्य.’’