अमरावती येथे भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर येथे झालेल्या दंगलीमागे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा हात असून त्याच या दंगलीच्या मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप येथील भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला होता. त्यानंतर येथील काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी डॉ. बोंडे यांच्या विरोधात १९ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची आणि शासनाची अपर्कीती केली. त्याचसमवेत समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात डॉ. बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डॉ. बोंडे यांनी वरील आरोप केल्याच्या निषेधार्थ अमरावती युवक काँग्रेसच्या वतीने मानसिक रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. तिवसा तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मोझरी येथील प्राचीन शिवमंदिरात जाऊन आरती केली, तसेच डॉ. बोंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत ‘त्यांना सद्बुद्धी मिळावी. त्यांचे मानसिक संतुलन सुधारावे’, असे साकडे घातले.