संपादकीय
मुंबईत दंगल घडवणार्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. ‘या घटनेवरून मुंबई पोलिसांमध्ये अस्मिता किंवा स्वाभिमान शिल्लक आहे कि नाही ?’, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. याच धर्मांध संघटनेने मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या दंगलीच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग केला होता, तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. केवळ मुंबईतच नव्हे, तर ‘अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे झालेल्या दंगलीत रझा अकादमीचा हात आहे’, असे सांगितले जाते. ही पार्श्वभूमी असतांना, तसेच स्वतःच्याच सहकार्यांवर अन्याय करणार्यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी होऊन पांडे यांनी मुंबई पोलीस दलात चुकीचा संदेश पोचवला आहे. एकेकाळी खाकी वर्दी परिधान करणार्यांविषयी जनतेच्या मनात आदरयुक्त भीती होती. आज दंगलखोरांची आणि त्याहून अधिक पोलिसांच्याच वर्दीवर हात टाकणारी टोळी पोलिसांनाच मेजवानी झोडायला बोलावते अन् उच्चपदस्थ पोलीस अधिकारी अशा दंगलखोरांच्या मांडीला मांडी लावून मेजवानी झोडतात, हे लज्जास्पद आहे. असे पोलीस दंगल काय रोखणार ? पोलिसांवर दंगलखोरांचे अन्न खाण्याची वेळ का आली ? किंवा ही वेळ त्यांच्यावर कुणी आणली ? अन्य वेळी ‘खाकी वर्दीची शान’ राखण्यासाठी तत्पर असल्याचे सांगणार्या पोलिसांचे हे नैतिक अधःपतन कीव आणणारे आहे.
आज रझा अकादमीने ‘इफ्तार पार्टी’ला बोलावले; म्हणून त्याला उपस्थित रहाणारे पोलीस अधिकारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिल्यास त्याला उपस्थित रहाणार का ? रमझानच्या काळात अनेक पोलीस अधिकारी इफ्तार पार्ट्यांना जातात. ‘सामाजिक सौहार्दता जपण्यासाठी असे करावे लागते’, असे सांगत ते त्यांच्या कृतीचे स्पष्टीकरण देतात; मात्र यातून सौहार्दता जपली जाते का ? श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी झालेल्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमणे केली. या वेळी हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केले, तसेच देहली येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी मुसलमानबहुल भागात गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी दगडफेक केली. या सर्वच घटना पहाता, ‘पोलिसांनी इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्याची फलनिष्पत्ती काय ?’, हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवे. सामाजिक सौहार्दता जपायची असेल, तर ती इफ्तार पार्ट्यांना जाऊन नव्हे, तर कायद्याचा धाक निर्माण केल्यास ती साध्य होईल; मात्र ‘अशी धडाडी पोलीस दाखवतील का ?’, हाही प्रश्नच आहे; कारण आतापर्यंत काही ठराविक दंगली सोडल्या, तर अन्य वेळी पोलिसांना दंगलखोर धर्मांधांना रोखण्यास पूर्ण अपयश मिळाले आहे. विशेष म्हणजे त्याचे पोलिसांना काही वाटतही नाही. असे स्वाभिमानशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत. कायद्याचे राज्य हवे असेल, तर पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत अभूतपूर्व पालट करणे आवश्यक आहे.