शब्दकोषासाठी स्वतंत्र ‘अॅप’ची निर्मिती : ३२ सहस्रांहून अधिक शब्दांसाठी मिळणार सुलभ शब्द !
मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – शासन आदेश, परिपत्रक, शासकीय पत्रव्यवहार आदी सरकारी कामकाजातील क्लिष्ट शब्दांसाठी पर्यायी सुलभ अन् सोप्या मराठी शब्दांचा ‘राज्य व्यवहार शब्दकोष’ सिद्ध करण्यात येत आहे. येत्या ५-६ मासांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाज, सामाजिक प्रसारमाध्यमे, तसेच नियमित व्यवहारात वापरल्या जाणार्या ३२ सहस्रांहून अधिक शब्दांसाठी या शब्दकोषात सुलभ शब्द उपलब्ध होणार आहेत. केवळ सरकारी कामापुरते नव्हे, तर हे शब्द सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी मराठी भाषा विभागाकडून स्वतंत्र ‘अॅप’ची निर्मिती करण्यात येणार आहे.
१. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन यांसाठी कार्यरत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नवीन राज्य व्यवहारकोषाचे काम चालू आहे.२. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या मराठी भाषा सल्लागार समितीतील काही सदस्यांकडून या शब्दकोषाचे काम चालू आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे या समितीचे अध्यक्ष आहेत.३. हा शब्दकोष पूर्ण करण्यासाठी समितीला ६ मासांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. ‘हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी मराठी भाषेतील अन्य तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात यावा’, अशी मागणी नुकतीच या समितीकडून शासनाकडे करण्यात आली आहे.४. यापूर्वीच्या शब्दकोषातील अनुमाने १० सहस्र शब्दांना अधिक सोपे शब्द सापडलेले नाहीत.५. आतापर्यंत राज्य व्यवहार शब्दकोषात हा मोठा पालट तिसर्यांदा होत आहे.६. या नवीन शब्दकोषात ४० सहस्रांहून अधिक शब्दांचा समावेश आहे. अशी माहिती भाषा सल्लागार समितीमधील एका सदस्याने दिली.
मराठी भाषेतील क्लिष्टता घालवून ती सर्वांना वापरावीशी वाटेल, अशी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न ! – सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री
अनेक प्रशासकीय अधिकारी टिपणी लिहितांना अडखळतात. राज्य व्यवहारकोषात असलेले मराठी शब्द अधिक किचकट असतात. यापूर्वीच्या राज्य व्यवहार कोषातील शब्द संस्कृतप्रचुर क्लिष्ट आहेत. हे शब्द जनतेला कळत नाहीत. हे मराठी शब्द अधिक सोपे आणि सुलभ करावेत, यासाठी मराठी भाषा सल्लागार समिती काम करत आहे. क्लिष्ट शब्दांना बोलीभाषेचा पर्याय सुचवण्यात येणार आहे. चपखल बसतील आणि लोकांना समजतील, असे शब्द घेण्यात येणार आहेत. भाषेतील क्लिष्टता घालवून राज्य व्यवहारकोष सर्वांना वापरण्यायोग्य झाला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होईल. हे अभ्यासपूर्ण करावे लागणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, यापेक्षा काम चोख व्हावे, हा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील बोलीभाषांतील पर्यायी शब्द घेण्यावर विचार चालू ! – लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, मराठी भाषा सल्लागार समिती.
महाराष्ट्रात एकूण ९१ बोलीभाषा आहेत. त्यांतील ५० बोलीभाषा मराठीच्या जवळच्या आहेत. त्यांमधील महत्त्वाच्या समृद्ध भाषांतून पर्यायी शब्द घेऊ शकतो का ? यांषियी विचार चालू आहे. ऐरणी, मालवणी, मराठवाड्यातील भाषा, उदगीरची भाषा आदी बोलीभाषांतील शब्द शासनाच्या व्यवहारकोषात आणले पाहिजेत. यामध्ये विशेषत: ग्रामीण साहित्य, मराठी साहित्य, तसेच संवादांमधील शब्द शासनाच्या व्यवहारकोषात आणले पाहिजेत.
संस्कृतप्रणीत शब्दांऐवजी सोपे शब्द देऊ शकतो का ? याचा विचार चालू आहे !
‘यापूर्वी असलेल्या राज्य व्यवहारकोषातील काही शब्द संस्कृतनिष्ठ आणि किचकट असल्याची भावना काही लोकप्रतिनिधींनी बोलून दाखवली होती. अशा प्रकारे १ सहस्र १०० शब्द यापूर्वी पालटण्यात आले आहेत. संस्कृतप्रणीत शब्दांऐवजी सोपे शब्द देऊ शकतो का ? याविषयी काम चालू केले आहे’, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.
मराठीत रूळलेले परकीय शब्द न काढण्याची मराठी भाषा विभागाची भूमिका !
‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’मध्ये प्रतिवर्षाला सहस्रावधी नवीन शब्दांची भर पडते. हे शब्द इंग्रजीमध्ये सिद्ध होत नाहीत. जगभरातील अन्य भाषांतील इंग्रजी भाषेत रुळलेले शब्द ते स्वीकारतात. त्यांना परकीय शब्द चालतात. यांमुळे भाषा अधिक समृद्ध होते. ‘संस्कार’ हा शब्द ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’मध्ये वापरला जातो; कारण त्याला असलेल्या पर्यायी शब्दात त्याचा भावार्थ येत नाही. ‘टेबल’ या शब्दाला ‘मेज’ म्हटले, तर कुणाला कळणार नाही. त्यामुळे शब्दांतील क्लिष्टता घालवावी, हा आमचा उद्देश आहे. जे इंग्रजी शब्द रूढ झाले आहेत, ते का पालटायचे ? अशा प्रकारे मराठी भाषेत रूळलेले परकीय शब्द न काढण्याची भूमिका भाषामंत्री सुभाष देसाई यांनी मांडली.
संपादकीय भूमिकास्वभाषेचे महत्त्व जाणून भाषेतील परकीय शब्द टाळण्यासाठी शासनाने भर द्यावा !भाषेचा संबंध हा थेट संस्कृतीशी असतो. मातृभाषेच्या उपयोगामुळे समाज आणि पर्यायाने राष्ट्राविषयी आत्मीयता निर्माण होते. स्वभाषेचे हे महत्त्व जाणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकानंतर मराठी भाषेचा राजकोश निर्माण केला. परकीय भाषेच्या आक्रमणाचा धोका महाराजांनी जाणला होता. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही मराठी भाषेतील परकीय शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द दिले. परकीय शब्दांच्या वापरातून भाषा कधीही समृद्ध होत नाही, तर हे मराठीवरील अतिक्रमण होय. बोलण्यात, लिहिण्यात आणि व्यक्त होण्यात अधिकाधिक उपयोग करणे यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे मराठी भाषेतील परकीय शब्द काढून त्यांना मराठी पर्यायी शब्द आणण्यासाठी सरकारने भर द्यावा. चपखल शब्द सापडत नसेल, तर परकीय शब्द वापरण्याऐवजी संस्कृतप्रणीत शब्दांचा उपयोग करावा. |
उच्चार करायला कठीण असलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृत भाषेतून पर्याय मिळाल्यास ते घ्यावेत ! – डॉ. दिलीप धोंडगे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती
इंग्रजीतील कितीतरी शब्द उच्चारता येत नाहीत, तरीही आपण ते वापरतो. त्यांना संस्कृत किंवा बोलीभाषेतून पर्यायी शब्द मिळत असतील, तर ते अवश्य घ्यावेत. त्यातून अर्थ प्रतीत होणे, हे महत्त्वाचे आहे. संस्कृतमधील अनेक शब्द आपण नियमित वापरतो, उदा. लग्न सभारंभात ‘आपले विनित’ हा शब्द वापरतो. यातून समारंभाला गौरवले जाते. कठीण शब्द वगैरे असे काही नसते. शब्द वापरल्याने सुबोध आणि सुगम होतात. त्यामुळे शब्दांचा उपयोग करून ते सुगम करावेत.