‘विंबल्डन’मध्ये रशियन खेळाडूंवर बंदी लादणे अस्वीकारार्ह ! – रशिया

जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहामधील २ पुरुष, तर पहिल्या २० मधील ३ महिला खेळाडू बाहेर पडणार !

उजवीकडे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्रो पेस्कोव्ह

मॉस्को (रशिया) – टेनिसमध्ये सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून लौकिक असलेल्या ‘विंबल्डन’मध्ये रशियन खेळाडूंवर बंदी लादण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंग्लंडच्या ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार असे झाल्यास ‘विंबल्डन’ ही रशियावर बंदी लादणारी पहिली स्पर्धा असेल. रशियाने या संभाव्य निर्णयास अस्वीकारार्ह म्हटले आहे. युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर अनेक जागतिक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर टेनिसवरही त्याचा प्रभाव पडल्यास ते रशियाला स्वीकारता येणार नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्रो पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले. ‘खेळाडूंना पूर्वग्रह आणि राजकीय संघर्ष यांमध्ये गुंतवून ‘राजकीय ओलीस’ ठेवण्यात येऊ नये’, असेही ते म्हणाले.

‘विंबल्डन’ने रशियन टेनिस खेळाडूंवर बंदी लादल्यास जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहामधील २ रशियन पुरुष, तर पहिल्या २० मधील ३ महिला खेळाडू बाहेर पडणार आहेत. यांमध्ये जागतिक क्रमवारीत दुसरा पुरुष खेळाडू असलेला डॅनिल मेदवेदेव आणि ८ व्या क्रमांकावर असलेल्या आंद्रे रुबलेव यांचा समावेश आहे.