अचलपूर येथील २ गटांतील दगडफेकीचे प्रकरण
अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १९ एप्रिल या दिवशी निदर्शने केली. त्यानंतर निवेदन देण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते; मात्र जिल्हाधिकारी पवनीत कौर एका बैठकीत व्यस्त असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर निवेदन चिकटवले. कार्यालयातील सुरक्षारक्षकांनी हे निवेदन तात्काळ फाडून टाकले. या वेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कक्षाजवळच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना अचलपूर दंगल प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे’, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला.
अचलपूर दंगलीमागे पालकमंत्री यशोमती ठाकूर ! – डॉ. अनिल बोंडे, माजी कृषी मंत्री आणि नेते, भाजप
अचलपूर शहरात झालेल्या दंगलीत येथील भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना पोलिसांनी अटक केली आहे; पण अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या दंगलीच्या मुख्य सूत्रधार आहेत.
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर म्हणाले, ‘‘अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आता ते दुपारीही मद्य पिऊ लागले आहेत. या दंगलप्रकरणी तेच मुख्य सूत्रधार आहेत. पोलिसांनी त्यांना कह्यात घ्यावे.’’
दुपारी २ घंटे संचारबंदी शिथील !
अचलपूर शहरात १८ एप्रिल या दिवशी झेंडा लावण्याच्या कारणावरून २ गटांत दगडफेक झाली होती. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात नागरिकांना जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी प्रशासनाने दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत संचारबंदीत काही अंशी शिथिलता दिल्याने बाजारपेठ चालू होती. त्यामुळे नागरिक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. ‘संचारबंदीमध्ये आणखी शिथिलता देऊन सकाळी बाजारपेठ उघडण्यासाठी अनुमती द्यावी’, अशी मागणी व्यावसायिक आणि नागरिक यांनी केली आहे.