अतिरेक टाळा !

लहान मुलांची पालटती जीवनशैली आणि आहार यांमुळे त्यांच्या आरोग्यावर कसे परिणाम होत आहेत, याविषयी ‘भारतीय बालरोगतज्ञ संघटने’चे राष्ट्रीय अध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र किंजवडेकर यांनी अतिशय महत्त्वाची अन् सर्वांनाच विचार करायला लावणारी माहिती सांगितली. ‘मुलांच्या सवयी आणि त्यांचे मुलांवर होणारे दुष्परिणाम’ याविषयी बोलतांना आधुनिक वैद्य उपेंद्र किंजवडेकर म्हणाले, ‘‘कोरोनामुळे २ वर्षे मुलांचा वेळ ऑनलाईन शाळा, भ्रमणभाष, दूरदर्शन संच आणि भ्रमणसंगणक पहाण्यात गेला आहे. यामुळे या मुलांना ‘स्क्रीन’ची लागलेली सवय अजूनही गेलेली नाही. ‘जंकफूड’, तसेच खाण्याच्या सवयी पालटल्यामुळे मुलांमध्ये स्थूलता आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढली आहे. हे प्रमाण ६ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांमध्ये अधिक आहे. सर्वांत गंभीर समस्या ही आहे की, ऑनलाईन परीक्षेमध्ये मुले उत्तीर्ण झाली असली, तरी ४० टक्के मुले अभ्यासात मागे आहेत. आम्ही पालकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहोत.’’

कोरोनाचा संसर्ग ही अचानक उद्भवलेली आपत्कालीन समस्या होती. यामध्ये आजारामुळे निर्माण झालेली बाह्य परिस्थिती आणि स्वभावदोष यांचा परिणाम म्हणून आता पहात असलेली सद्यःस्थिती किती भीषण अन् भयावह आहे, हे वरील माहितीवरून लक्षात येते. मुलांमधील या समस्येचा विचार पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी आताच गांभीर्याने न केल्यास येणारी पिढी कशी असेल ? याचा अंदाज आपण करू शकतो. कोणत्याही गोष्टीचा ‘अतिरेक’ किती महागात पडतो, हे लक्षात येते. चांगल्या सवयी लावणे अवघड आहे; परंतु अयोग्य सवयी लगेचच लागतात आणि त्या घालवण्यासाठी कष्टही पुष्कळ घ्यावे लागतात. कोरोनाच्या महाभयंकर आपत्काळाचा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम पहाता आपण सर्वांनीच आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी किती प्रमाणात सिद्ध व्हायला हवे, याचा अंदाज बांधता येतो.

यामुळे पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा सर्वच गोष्टींत सरस असणारी भारतीय संस्कृती आचरणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा मनावर बिंबते. ‘जंकफूड’ऐवजी आयुर्वेदानुसार सांगितलेला पोषक आहार घेणे, योगासने करणे, प्रत्येक गोष्टीचा मर्यादेतच वापर करणे याची सवय सर्वांनी लावणे आवश्यक आहे, तरच येणाऱ्या आपत्काळाला आपण सामोरे जाऊ शकतो, हे नक्की !

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.