कोल्हापूर – कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ‘काळम्मावाडी थेट पाणीवाहिनी योजने’च्या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या. रात्रंदिवस काम चालू ठेवा; पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी १९ एप्रिल या दिवशी ‘काळम्मावाडी थेट पाणी पाणीवाहिनी योजने’च्या कामाची पहाणी करून उर्वरीत अपूर्ण कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले.
प्रकल्प अभियंता राजेंद्र माळी म्हणाले, ‘‘हे काम युद्धपातळीवर चालू असून जॅकेवेलचे २५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. त्याचसमवेत पाण्याच्या टाकीचे काम ९७ टक्के झाले आहे, तर या योजनेच्या एकूण ५२.९७ किलोमीटर पाणीवाहिनी टाकण्याच्या कामापैकी ५२ किलोमीटर वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २७ किलोमीटरचे काम मे अखेर पूर्ण होईल.’’