प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या आणि उत्तम समन्वय साधून तळमळीने सेवा करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

सद्गुरु आणि संत यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी  डगवार यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

साधकांची प्रगती व्हावी, यासाठी त्यांना प्रेमाने साधनेत साहाय्य करणाऱ्या, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणाऱ्या मूळच्या वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणाऱ्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११९ व्या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी १० एप्रिल २०२२ या दिवशी केली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) डगवार यांची मुलाखतीतून उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. शारीरिक त्रास होत असतांना भावजागृतीसाठी प्रयत्न केल्यास सकारात्मक रहाता येते !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : शारीरिक त्रास होत असतांनाही तुम्ही साधनेचे प्रयत्न कसे करता ?

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : शरिराला त्रास होत असतो, तेव्हा मनाने प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे, स्वयंसूचना सत्र करणे, हे प्रयत्न करायचे. ‘त्रास होत असतांनाही देव साधनेचे प्रयत्न करवून घेतो’, यासाठी कृतज्ञताभावात रहायचे. शक्य असल्यास सत्संगाला ‘ऑनलाईन’ उपस्थित राहून सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे नकारात्मक विचार आले नाहीत. ‘देव शारीरिक प्रारब्ध नष्ट करत आहे, औषध म्हणजे प्रसाद आहे’, असा भाव ठेवावा. भावाचे प्रयत्न करत राहिल्यास ‘आपल्याला त्रास होत आहे’, असे वाटत नाही आणि मन सकारात्मक रहाते.

२. आवश्यक तेथे साधकांचे साहाय्य घेऊन सेवा केल्याने आनंद मिळाला !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : आपण वर्धा येथे जिल्हासेवक म्हणून सेवा कशी केली ?

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : मी जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराच्या समन्वयाची सेवा करतांना लहान होऊनच (स्वत:कडे कमीपणा घेऊन) करत होते. गुरुदेवच सर्व करवून घेत आहेत. मला टंकलेखन येत नव्हते. त्यामुळे साधकांचे साहाय्य घेऊन सेवा करत होते. मी जशी आहे, ते सांगून, साधकांचे साहाय्य घेऊन करत राहिले. त्यामुळे आनंद मिळत गेला.

३. केंद्रातील साधकांना आधार वाटावा, यासाठी प्रयत्न केले !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : वर्धा येथे साधकसंख्या तुलनेने अल्प आहे, तरी तुम्ही कसे प्रयत्न केले ?

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना नियोजन करून सेवांना समयमर्यादा घालत असे. उपलब्ध साधकांमध्ये सेवा कशी करू शकतो, याचे नियोजन आम्ही करत असू. ‘केंद्रातील साधकांना आपला आधार वाटावा’, असे वाटत असे. त्यांच्याशी बोलतांनाही तसे प्रयत्न करत असे.

सेवांमध्ये अडचणी आल्यावर धर्मप्रचारक संतांचे मार्गदर्शन घेतले; परंतु सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

४. साधनेत नकारात्मकता कधीच आली नाही !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : साधना करू लागल्यावर प्रारंभी तुमच्या यजमानांची साधनेला विशेष अनुकूलता नव्हती. तेव्हा ‘मला सेवा जमणार नाही’, असे कधी वाटले का ?

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : ‘सेवा जमणार नाही’, असे गुरुदेवांच्या कृपेने कधीच वाटले नाही. त्यांनीच ती करवून घेतली. नकारात्मकता कधीच आली नाही. प्रारंभी यजमानांना मी साधनेचे प्रयत्न केलेले आवडत नसे, तरीही गुरुदेवांनी साधना करवून घेतली. नंतर यजमानही सकारात्मक झाले. आता मागे वळून पहाते, तेव्हा देवाने कसे करवून घेतले, याविषयी कृतज्ञता वाटते. मी केवळ जी सेवा आली, तिला ‘हो’ म्हणत गेले.

५. यजमानांची प्रकृती समजून घेऊन प्रयत्न करत राहिल्याने त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी साधनेला आरंभ केला !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : साधनेविषयी यजमानांची अनुकूलता नसतांनाही तुम्ही सेवा कशी केली ? कालांतराने यजमान स्वतः साधना करू लागले. तेव्हा तुम्ही त्यांचे मतपरिवर्तन कसे केले ?

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : मी पेशाने शिक्षिका होते; पण मला साधनेचा प्रसार करण्यासाठी सत्संग घेण्याची तळमळ होती. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवते, त्याने पैसे मिळतात, तर ‘समाजात अध्यात्मप्रसार करण्यासाठी सत्संग घेतला, तर माझी साधना होईल’, असे मला वाटायचे. मी सेवेला जाण्यापूर्वी घरातील सर्व कामे, स्वयंपाक असे करूनच जात असे. सेवेला गेल्यावरही ‘जेवण झाले का ?’, ‘औषधे घेतली का ?’, अशी त्यांच्याकडे विचारपूस करत होते. त्यांची प्रकृती समजून घेऊन मी प्रयत्न करत असे. त्यामुळे कालांतराने त्यांचे साधनेविषयी मतपरिवर्तन झाले आणि यजमानही साधना करू लागले. मुलांनीही मला साधनेत साहाय्य केले.

यजमान रामनाथी आश्रमात आले, तेव्हा त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वरूप विशाल असून ते महाविष्णुस्वरूपात आहेत’, असे दृश्य दिसले होते. त्यामुळे त्यांची पुष्कळ भावजागृती झाली होती. गुरुदेवांना साधकाची श्रद्धा वाढवण्यासाठी काय काय करावे लागते, हे तेव्हा मला लक्षात आले. माझा मुलगा अमित याला पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा होती, तेव्हाही त्यासाठी यजमानांची विशेष अनुकूलता नव्हती. त्या प्रसंगातही माझ्या मनात कुठलाच विचार आला नाही. ही सर्व कृष्णलीलाच होती.

पू. डगवारकाकू नेहमी शांत आणि आनंदी असतात ! – सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘श्रीमती डगवारकाकूंना मागील ३-४ मासांपासून मी पहात आहे. त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती आणि त्या जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराच्या सेवेचा समन्वयही पहातात; परंतु त्यांच्याकडे पाहून ‘त्यांच्याकडे प्रसारसेवेच्या अंतर्गत काही दायित्व आहे’, असे वाटत नव्हते. त्या नेहमी शांत आणि आनंदी दिसतात. त्यांना आध्यात्मिक त्रास होत असतांना मी सूक्ष्मातून त्यांच्यावरील त्रासदायक आवरण काढणे, त्यांच्यासाठी नामजप करणे, या सेवा केल्या आहेत. एखाद्या दिवशी त्यांना त्रास होत असला, तरी दुसऱ्या दिवशी त्यांचा तोंडवळा पाहून ‘यांना काल त्रास होत होता’, असे जाणवायचे नाही.’

पू. डगवारकाकू यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवते ! – पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर, एस्.एस्.आर्.एफ.

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

पू. (श्रीमती) डगवारकाकू व्यासपिठावर आल्यावर मला ‘त्यांच्यामागे श्रीकृष्ण उभा आहे’, असे दिसले आणि त्यांना संत घोषित केल्यावर ‘मागे उभा असलेला श्रीकृष्ण नटखटपणे त्यांच्याकडे पहात आहे’, असे दिसले. ‘त्या इथे (सोहळ्याच्या ठिकाणी) आहेत’, असे वाटत नाही. त्यांच्या जागी केवळ परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते आणि ‘मी काकूंना पुष्कळ आधीपासून ओळखत आहे’, असे वाटते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

१. ‘लहानपण देगा देवा…’ या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज विठ्ठलाकडे ‘देवा मला अत्यंत लहान बनव’, अशी प्रार्थना करतात. लहान मुलांचे मन संस्कारविहिन म्हणजे निर्मळ असते. छोटेपणा म्हणजे सेवकभाव ! बाह्य जगतात लोकांना मोठेपणा हवा असतो; मात्र आपल्याला सेवक बनून गुरूंची सेवा करायची आहे.

२. मन सकारात्मक राहिले, तर साधनेचे प्रयत्न होतात. सकारात्मक रहाण्यासाठी मनाला स्वयंसूचना देऊ शकतो. पू. डगवारकाकूंकडून सकारात्मकता शिकायला मिळते. त्यांच्यातील विविध गुण शिकून साधकांनी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

३. साधनेत विरोध करणाऱ्यांविषयी अनेकांच्या मनात नकारात्मकता असते. पू. काकूंना साधनेसाठी घरी विशेष अनुकूलता नसतांना त्यांनी यजमानांची प्रकृती समजून घेऊन ‘त्यांना अडचण येऊ नये’, याची काळजी घेतली. त्यामुळे काकांमध्येही परिवर्तन झाले. ‘कठीण स्थितीतही सकारात्मकतेने साधना करून साधनेविषयी प्रतिकूल मते असणाऱ्यांचे कसे मतपरिवर्तन करायचे ?’, याचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

व्यष्टी साधनेतील सातत्य आणि उत्तम समन्वय करून समष्टी सेवा करणाऱ्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

पू. अशोक पात्रीकर

‘देवाने श्रीरामनवमीच्या दिवशी पुष्कळ आनंददायी क्षण अनुभवायला दिला. या दिवसाची मी पुष्कळ वाट पहात होतो. तो आज अनुभवता आला. त्यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘श्रीकृष्णाची भावार्चना पू. (श्रीमती) डगवारकाकूंच्या आवाजातील आहे’, हे सांगितल्यावर एक क्षण विश्वासच बसला नाही. पू. काकूंचा आधीचा आवाज आणि संत झाल्यानंतरचा आवाज यांत पुष्कळ भेद आहे. ‘संत झाल्यानंतर वाणीत किती मधुरता येते’, हे लक्षात आले. त्यांची लक्षात आलेली विविध गुणवैशिष्ट्ये सर्वांना शिकण्यासारखी आहेत.

१. व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने आणि तळमळीने करणे : विदर्भात सेवा करतांना पू. डगवारकाकू व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करून त्याचा आढावा देत असत. त्या त्यांचे नामजपादी उपाय नियमित पूर्ण करतात. मनाच्या स्तरावरील चुका व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्याविषयी मार्गदर्शन घेतात. पू. काकू त्यांना दिलेली सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक प्रसंगात शिकण्याच्या स्थितीत रहाणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ‘झालेल्या चुकांतून कसे शिकू ?’, ‘त्या चुका कशा टाळू शकतो ?’, यासाठी त्या प्रयत्न करतात.

२. साधिकेसमवेत सेवांचा उत्तम समन्वय करणे : प्रसारातील सत्संगात त्या जेव्हा भावार्चना घेतात, तेव्हा ऐकणाऱ्या सर्व साधकांचा भाव जागृत होतो. त्यांच्यासमवेत अन्य एक साधिकाही सेवा करते. दोघींमध्ये सेवेचा समन्वय इतका चांगला आहे की, त्यांच्यात मतभेदाचे प्रसंग कधीच निर्माण होत नाहीत. कधी एखादा प्रसंग घडलाच, तर त्या आपापसांत सोडवतात. सेवेच्या दृष्टीने जे काही सांगितले जाते, ते त्या सहजतेने स्वीकारतात.

३. साधकांना प्रेमाने साहाय्य करणे : साधकांची क्षमता ओळखून आणि ‘साधकांना सेवांचा अनावश्यक ताण येऊ नये’, याची काळजी घेत त्या प्रसारातील उपक्रम राबवतात. त्यामुळे साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. त्या जिल्ह्यातील साधकांशी अनौपचारिक संपर्कात असतात. त्यांची प्रेमाने चौकशी करतात. त्यामुळे साधकही स्वतःहून त्यांच्या अडचणी मोकळेपणाने पू. काकूंना सांगतात. पू. काकूही त्यांना लगेच साहाय्य करतात. साधकांच्या घरी कुणी आजारी असेल, तर पू. काकू दूरभाष करून त्यांची चौकशी करतात. कोरोना महामारीच्या काळात काकूंनी साधकांचे बरेच सांत्वन केले आणि त्यांना आधार दिला.

४. घरातील वातावरण सात्त्विक रहाण्यासाठी प्रयत्न करणे : त्यांच्या घरी २४ घंटे प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, परमपूज्य डॉक्टरांच्या आवाजातील ‘साधना आणि शंकानिरसन’ हे प्रवचन, आदी चालू असते. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण सात्त्विक झाले. कै. डगवारकाकांवरही त्या चैतन्याचा परिणाम झाला आणि काकांच्या शंकांचे निरसन होत गेले. काकांना श्री. अमितची (मुलाची) काळजी वाटत असली, तरी पू. काकूंनी सर्व सांभाळून घेतले. मी त्यांच्या घरी गेल्यानंतर कै. डगवारकाका काकूंविषयी काही प्रसंग सांगायचे. काकू ते शांतपणे ऐकून घ्यायच्या.’

५. पू. (श्रीमती) डगवारकाकू सत्संगांमध्ये घेत असलेल्या भावार्चनेचे वैशिष्ट्य !

पू. डगवारकाकू भावार्चना करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण अन् तळमळीने प्रार्थना करतात, ‘तुम्हीच भावार्चना सुचवा, ज्यामुळे आम्हाला तुमच्या स्मरणात रहाता येईल. माझे अस्तित्व नष्ट होऊन सत्संगात तुमचेच अस्तित्व असू दे.’

त्या तळमळीने सांगत असल्यामुळे ‘भावार्चनेतून पुष्कळ आनंद मिळाला’, असे साधक सांगतात, तसेच पुष्कळ वेळ साधक भावाची स्थिती अनुभवतात. काकू स्वतः उच्च भावाच्या स्थितीत असल्यामुळे त्यांचा आवाज ऐकतांना ‘परात्पर गुरुदेवांचा आवाज ऐकत आहोत’, अशी अनुभूती येते.’

श्रीमती मंदाकिनी डगवार यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

कु. मधुरा भोसले

१. श्रीमती डगवारकाकू यांच्या सहवासात संतांची प्रीती, चैतन्य आणि आनंद अनुभवता येणे

श्रीमती डगवारकाकू यांच्या सहवासात असतांना संतांची प्रीती, चैतन्य आणि आनंद अनुभवल्याची अनुभूती येऊन त्यांच्या सहवासात असतांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण अल्प होऊन मन शांत होते.

२. श्रीमती डगवारकाकू ‘संत झाल्याचे जाणवून त्यांना ‘पूजनीय’ असे संबोधावे’, असे वाटणे

काही दिवसांपासून श्रीमती डगवारकाकूंची आठवण आल्यावर किंवा त्यांना पाहिल्यावर त्या ‘संत झाल्या आहेत’, असे जाणवून त्यांना ‘पूजनीय डगवारकाकू’ असे संबोधावे’, असे वाटते. ‘परात्पर गुरुदेव त्यांना लवकरच ‘संत’ घोषित करतील’, असे मला वाटते.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.