१. जिज्ञासूंनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास कसा करावा ?
१ अ. जिज्ञासूंच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्याचे महत्त्व : ‘आपण समाजात जिज्ञासूंना संपर्क करतो. ‘संपर्काला जातांना जिज्ञासूंच्या प्रतिक्रियांचा अभ्यास कसा करावा ?’, हे देवाने मला शिकवले. प्रतिक्रियांचा अभ्यास का करायला हवा ?, तर प्रतिक्रियांवरून मनाचा वेध घेता येतो. त्यामुळे ‘जिज्ञासूची अडचण काय आहे ? त्याला काय समजले आहे ? काय समजले नाही ?’ हे सर्व समजल्यामुळे आपल्याला पुढचे बोलणे सोपे होते आणि आपली पुष्कळ शक्ती वाचते. त्यासह ‘जिज्ञासूला विषयाचे आकलन किती होत आहे ? त्यात पालट करायला हवा का ?’, हेही आपल्या लक्षात येते आणि आपल्याला मोजके बोलणे शक्य होते. ‘समोरच्याची आवड आणि विचारसरणी कशी आहे ?’, हे लक्षात येते; म्हणून प्रतिक्रियांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे; पण बऱ्याच वेळा आपण जिज्ञासूंच्या प्रतिक्रिया फारच सहजतेने घेतो किंवा सोडून देतो. त्यावर चिंतन आणि मनन करत नाही. वेळोवेळी त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लिहून देत नाही. साधकांनी या चुका टाळाव्यात.
१ आ. एका वाचकांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ ही भगवद्गीता आहे’, असे सांगणे, ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक इतरांना वाचायला देत असल्याचे समजणे, ऐकायला अल्प येत असूनही ते सत्संगात आनंदी असणे आणि ‘त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते’, असे एका संतांनी सांगणे : एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकांकडे संपर्काला गेलो होतो. त्यांना ‘दैनिक वाचायला वेळ मिळतो ना ?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’ ही भगवद्गीता आहे.’’ मी म्हणालो, ‘‘छान आहे.’’ अंदाज घेतल्यावर माझ्या लक्षात आले, ‘त्यांनी भगवद्गीताही वाचली आहे.’ ‘ही प्रतिक्रिया साधकाप्रमाणे आहे’, हे लक्षात आल्यावर त्यांना सत्संगात जोडण्यासाठी प्रयत्न झाले.
ते स्वतः दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि नंतर एका मंदिरात दैनिक घेऊन जातात. ते कामावर जातांना दैनिक ‘सनातन प्रभात’, विशेषांक, तसेच त्यातील काही महत्त्वाचे लेख इतरांनी वाचावे; म्हणून त्यांना भेट देतात. हे ऐकल्यावर मी म्हणालो, ‘‘तुम्ही छानच करता !’’
ते म्हणाले, ‘सनातन संस्थेच्या संदर्भात मी आमच्या समाजाच्या लोकांना सांगून थकलो. कुणीही पालटत नाही. ते केवळ आपलेच घेऊन बसतात.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘यातून देवाला तुम्हाला निवडायचे होते. तुमच्याकडून साधना करवून घ्यायची होती आणि लोकांसारखे तुम्हाला तेथेच अडकू न देता पुढे घेऊन जायचे होते.’’
विशेष म्हणजे, त्यांना कानाने ऐकायला अल्प येते. त्यासाठी त्यांना सत्संगात जवळ बसवले जाते. ऐकायला अल्प येत असूनही ते सत्संगात आनंदी असतात.
एका संतांशी झालेल्या त्यांच्या भेटीमध्ये त्या संतांनी तेथील साधकांना विचारले, ‘‘यांच्या तोंडवळ्याकडे पाहून चांगले वाटते ना ?’’ सर्वांनी ‘हो’, असे सांगितले.
वरील प्रतिक्रियेचा अभ्यास केल्यावर ‘देव अनेक गोष्टी आपल्यासमोर उघड करतो’, हे शिकायला मिळाले.
१ इ. २० वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक असलेल्या एका जिज्ञासूकडे पाहून चांगले वाटणे, ‘ते नामजप करत नाहीत’, हे कळल्यावर त्यांना नामजपाचे महत्त्व सांगणे आणि ‘अधिक कालावधीपासून वाचक असलेल्यांना सत्संगाला जोडायला हवे’, हे लक्षात येणे : मी दुसऱ्या एका वाचकाकडे विज्ञापन आणण्यासाठी प्रथमच गेलो होतो. ते एका खात्यामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ते म्हणाले, ‘‘मी गेली २० वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. माझ्याकडे अन्य सर्व वृत्तपत्रे येतात; पण घरी मी केवळ ‘सनातन प्रभात’च वाचतो. अन्य वृत्तपत्रे घरी चाळतही नाही. कार्यालयात आल्यावर चाळायला पाहिजे; म्हणून वाचतो. अन्य वृत्तपत्रे १ – २ मिनिटे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ न्यूनतम १ घंटा वाचतो.’’ त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला चांगले वाटले. ‘२० वर्षे प्रतिदिन दैनिक वाचल्यामुळे देवाने त्यांना घडवले आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘ते विज्ञापनदाते आहेत’, हे त्याच संपर्कात मला समजले. नामजपाविषयी विचारल्यावर ‘ते नामजप करत नाहीत’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर बोलणे झाले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘काही जण १०, २० वर्षांपासून दैनिक, साप्ताहिक, मासिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्यांना आपण सत्संगाला जोडायला हवे. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.’
१ ई. सरकारी खात्यात कामाला असणाऱ्या वाचकांची सूची करणे आवश्यक ! : प्रत्येक राज्यात जिल्हा स्तरावर सरकारी खात्यात काम करणारे जे आपले वाचक आहेत, त्यांची सूची असली, तर आपल्याला सरकारी कामांसाठी त्यांचा उपयोग होतो. मला असा एखादा संपर्क मिळाल्यास मी त्याची माहिती संबंधित उत्तरदायी साधकाला कळवतो.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते यांना निरपेक्षपणे संपर्क कसा करावा ?
२ अ. पहिला संपर्क काही न मागता निरपेक्षपणे करता आला पाहिजे ! : आपण प्रतिदिन संपर्काला जातो. संपर्काला गेल्यावर आपण विज्ञापने, दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी इत्यादींविषयी सांगतच असतो. तेच विचार आपल्या मनात असतात. ते चुकीचे आहे, असे नाही. ‘निरपेक्षतेचा संस्कार मनावर दृढ व्हावा’, यासाठी ‘पहिला संपर्क करतांना काही मागायचे नाही’, असे ठरवावे.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. तिचे सार पुढीलप्रमाणे होते, ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यात जे झोकून देऊन प्रयत्न करतील, त्यांची अध्यात्मात प्रगती होईल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आपल्याकडून काहीही अपेक्षाच नाही. ‘केवळ साधना करून तुमचे कल्याण होऊ दे’, असे त्यांना वाटते.’ ही निरपेक्षता आपल्यामध्ये यायला हवी. त्यासाठी प्रतिदिन पहिला संपर्क विज्ञापने, दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी याविषयी काहीही न सांगता करता यायला हवा.
२ आ. निरपेक्षतेने संपर्क केल्याने होणारे लाभ
१. पहिलाच संपर्क असल्याने आपल्या मनावर आरंभीच निरपेक्षतेचा संस्कार होतो.
२. ‘समोरच्याने साधना करावी’, हेच देवाला अपेक्षित आहे’, हे आपल्या लक्षात येते आणि मनावर बिंबते.
३. वरीलप्रमाणे काहीही सांगायचे नसल्याने मनाचा आरंभी संघर्ष होईल आणि त्यातून साधना होईल.
४. संपर्कात मनाची एकाग्रता होऊन सेवेशी समरस होता येते.
५. पहिला संपर्क असा झाल्यानंतर अन्य संपर्क आणि पहिला संपर्क यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल, ‘पहिल्या संपर्कात मला अधिक आनंद मिळाला. मन उत्साही होते. शिकायला मिळाले.’ त्यातून अभ्यास चालू होतो आणि चिंतन, मनन होते.
६. हळूहळू अन्य संपर्क करतांनाही शेवटच्या २ मिनिटांत काय ते मागावे. बाकीच्या वेळात विज्ञापने, दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी इत्यादींविषयी काहीही न सांगता आणि मनात असा विचार न येऊ देता संपर्क करावा. असे केल्याने सर्व संपर्कांत पहिल्या संपर्काप्रमाणेच आनंद मिळायला लागतो.
७. यामुळे ‘ईश्वराचे (परात्पर गुरूंचे) सृष्टीतील कार्य किती निरपेक्षतेने चालू असते ?’, या संदर्भात मनात कृतज्ञता निर्माण होण्यास साहाय्य होते. ‘अनुसंधानामुळे देवाचे कार्य कसे चालते ?’, हे लक्षात येते. त्यामुळे अनुसंधानात वाढ होते. कर्तेपणा देवाला अर्पण होतो. ‘देवासारखे सर्व कार्य करूनही आपण त्याच्यासारखे नामानिराळे रहायला हवे’, हे आतूनच वाटायला लागते. मग कौतुकाची अपेक्षा रहात नाही. केवळ आनंद मिळतो.
३. सनातनच्या ग्रंथांना समाजातून होत असलेली मागणी !
३ अ. राज्यसभेच्या एका खासदारांनी राज्यातील २१ सरकारी वाचनालयांसाठी सनातनचे ग्रंथ प्रायोजित करणे : एका राज्यात राज्यसभेच्या एका खासदारांची भेट झाली. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते आहेत. त्यांना सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगून वाचनालयांना काही ग्रंथ प्रायोजित करण्याच्या संदर्भात विचारले. त्यांनी त्या राज्यातील २१ सरकारी वाचनालयांसाठी सनातनचे ग्रंथ प्रायोजित केले.
३ आ. लोकसभेच्या एका खासदारांनी ‘तुमचे ग्रंथ चांगले असून ते एका राज्यात नव्हे, तर अन्य राज्यांतही देता येतील; मला हिंदी आणि इंग्रजी प्रकल्प सिद्ध करून द्या’, असे सांगणे : एका राज्यात लोकसभेच्या एका खासदारांची भेट झाली. त्यांना शाळा आणि महाविद्यालये यांसाठी ग्रंथ प्रायोजित करण्याच्या संदर्भात विचारले, तसेच ग्रंथसूची दाखवून ग्रंथांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘एका राज्यातच नाही, तर अन्य राज्यांतही तुमचे ग्रंथ देता येतील. ग्रंथ चांगले आहेत. मला हिंदी आणि इंग्रजी प्रकल्प सिद्ध करून द्या. यासाठी ‘निधी कसा उभा करायचा ?’, ते मी पहातो.’’ देवाने त्यांच्या मनात अनेक राज्यांत ग्रंथ वितरण करण्याचा विचार दिला. कलेच्या संदर्भात सेवा करणाऱ्या साधकांनी हा प्रकल्प सिद्ध केला. त्या खासदारांकडे तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. नंतर मला समजले, ‘लोकसभेचे ते खासदार शाळा/महाविद्यालये यांसाठी ५० सहस्र रुपयांचे ग्रंथ प्रायोजित करू शकतात.’
आपल्याला अन्यत्रही असे प्रयत्न करता येतील.
देवा, तुझ्या कृपेनेच ही सूत्रे लक्षात आली. श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण !’
– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२०)