श्रीरामनवमीच्या निमित्ताने सोलापूर येथे सहस्रो कुटुंबांनी केले हवन !

श्रीरामरक्षा स्तोत्रासह हवन करतांना एक कुटुंब

सोलापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – श्रीरामनवमीच्या निमित्ताने सोलापूर येथे सहस्रो कुटुंबातील सदस्यांनी श्रीरामरक्षा स्तोत्रासह देशी गायीच्या गोवऱ्या, गायीचे तूप, अक्षता आणि कापूर यांच्या साहाय्याने हवन केले. या उपक्रमासाठी येथील अहिंसा गोशाळेच्या वतीने ७ सहस्र ७२५ देशी गायींच्या गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येक कुटुंबाला २ गोवऱ्या देण्यात आल्या होत्या. वातावरण शुद्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सोलापूर येथील ३ सहस्र कुटुंबे, तर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील १०० कुटुंबे सहभागी झाली होती, अशी माहिती गोसेवक श्री. गोपाल सोमाणी यांनी दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर येथील गीता परिवार, राम सेवा समिती, श्रीराम जन्मोत्सव समिती, माहेश्वरी युवा संघटन, अग्रवाल सेवा समिती ट्रस्ट, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शंखेश्वर जैन युवा मंडल, जय हिंद फूड बँक, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान या संघटनांनी विशेष प्रयत्न केले.

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पाप्रीत्यर्थ १०८ हवन कुंडाचे आयोजन !

सोलापूर येथे हवन करतांना दांपत्य

सोलापूर – हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पाप्रीत्यर्थ, तसेच लोककल्याणार्थ श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर आणि अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघम यांच्या संयुक्त विद्यमाने ९ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीच्या निमित्ताने १०८ हवन कुंडाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.