मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांची सूचना
‘महाराष्ट्रात सरकारी वाहिन्यांनाही मराठी भाषेच्या कार्यक्रमांना प्राधान्य द्या’, असे सांगण्याची वेळ संबंधित मंत्र्यांवर येणे, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लज्जास्पद नव्हे का ? या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तरच भाषेच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होणार नाही. – संपादक
मुंबई – आकाशवाणी, दूरदर्शन यांसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी महत्त्वाच्या वेळेत (‘प्राइम टाइम’मध्ये) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावे. मुंबई आकाशवाणीवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. दृकश्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
सुभाष देसाई पुढे म्हणाले की, राज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम चालू रहाणे आवश्यक आहे. आकाशवाणीसह विविध खासगी नभोवाणींवरील मराठी कार्यक्रमांची संख्या अल्प झाली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरून अनेक मराठी कार्यक्रम हद्दपार झाले आहेत. या ठिकाणी हिंदी, इंग्रजी कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यापुढे आकाशवाणीने मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावी, खासगी नभोवाणी केंद्रांनीही किमान २ घंटे मराठी कार्यक्रम प्रसारित करावेत, असे देसाई यांनी सांगितले.
मराठी वाहिन्यांवरून मराठी कार्यक्रम हद्दपार होत असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. त्या वेळी देसाई यांनी संबंधित नभोवाणी केंद्रांना मराठी भाषेतील कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करण्याची सूचना केली.