दांभिक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांना सत्तेपासून कायमचे दूर ठेवा !

‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने…

हिंदूंना प्रतिदिन दिली जाणारी धर्मनिरपेक्षतेची लस पुरोगामी म्हणवणाऱ्या अल्पसंख्यांकांना कधी देणार ?

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून वादंग निर्माण झाला आहे. विशेषत: मुसलमान संघटना, त्यांचे नेते आणि त्यांच्या पुढे मतांसाठी लाचार झालेले ‘धर्मनिरपेक्ष’ नेते विरुद्ध काश्मिरी हिंदु अन् हिंदुत्वनिष्ठ असा हा वादंग दिसून येतो. स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणारे अन् ते सिद्ध करण्यासाठी धर्मांधांना कुरवाळणारे राजकीय नेते या चित्रपटामुळे फार व्यथित झालेले दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर ‘या चित्रपटामुळे दोन समाजांत फूट पडत आहे. त्यामुळे या चित्रपटाला अनुमतीच द्यायला नको होती’, असा निर्वाळा दिल्याचे माध्यमांतून समजले.

१. स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या नेत्यांची हिंदूंविषयीची हीन मनोवृत्ती दिसून येणे

यातून मोहनदास करमचंद गांधी आणि काँग्रेस यांनी आरंभीपासून हिंदूंच्या दमनाची अन् मतांसाठी धर्मांधांच्या लांगूलचालनाची जी भूमिका ठेवली होती, तीच भूमिका पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकारण्यांनी आजही चालू ठेवल्याचे दिसून येते. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात काही धर्मांध लोक एका हिंदु स्त्रीला यांत्रिक करवतीने कापून तिच्या शरिराचे दोन तुकडे करतांना दाखवले आहेत. ही घटना काल्पनिक नसून तसे प्रत्यक्षात एका काश्मिरी हिंदु स्त्रीविषयी घडले होते; मात्र (शरद पवारांसह) एकाही पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकीय नेत्याने त्या घटनेचा अन् ते कृत्य करणाऱ्या धर्मांधांचा तेव्हा किंवा आजही साधानिषेध केलेला नाही.

यातून स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या नेत्यांची हीन मनोवृत्ती दिसून येते ती अशी की, धर्मांधांनी हिंदु स्त्रियांच्या शरिराचे यांत्रिक करवतीने कापून दोन तुकडे केले तरी चालतील; पण ती घटना चित्रपटात दाखवून धर्मांधांना दुखवू नका.’

श्री. सुनील घनवट

२. केरळमध्ये मोपल्यांनी सहस्रो हिंदूंची धर्मांधांनी हत्या करूनही गांधींनी काहीही न करणे आणि धर्मांधांच्या हत्या झाल्यावर त्याविषयी त्यांनी कळवळा दाखवणे

या पार्श्वभूमीवर दोन घटनांचे स्मरण होते. वर्ष १९२१ मध्ये केरळमध्ये मोपल्यांनी दंगे करून सहस्रो हिंदूंचे शीरकाण केले होते. दोन विहिरी हिंदूंच्या प्रेतांनी भरल्या, तरीही गांधींचे अंत:करण जागचे हललेही नव्हते. मग हिंदूंनी जेव्हा प्रतिकार चालू केला आणि त्यात पन्नास-शंभर धर्मांध मोपले मरण पावले, त्या वेळी गांधींचे अंत:करण पिळवटले. ते उरलेल्या धर्मांधांच्या रक्षणासाठी केरळमध्ये धावून गेले आणि त्यांनी निक्षून सांगितले की, एका बाजूला सहस्रो हिंदू मेले असले, तरी दुसऱ्या बाजूला पन्नास-शंभर धर्मांधही मेले आहेत, म्हणजे दोन्हीकडे सारखीच हानी झाली आहे. तेव्हा आता दंगे थांबवा.

३. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांच्या लेखी हिंदूंच्या जीविताचे अन् हिंदु स्त्रियांच्या अब्रूचे मूल्य शून्यच !

वर्ष १९४६ मध्ये बंगालचा मुख्यमंत्री सुऱ्हावर्दी याच्या आशीर्वादाने धर्मांधांनी दंगे करून सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे शीरकाण केले. सहस्रो हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले; पण गांधींना त्याचे काहीच सुवेरसुतक नव्हते; मात्र जेव्हा हिंदूंनी प्रतिकार चालू केला आणि त्यात धर्मांध बळी पडू लागले, तेव्हा मात्र गांधी यांना घोर दु:ख झाले अन् त्या दु:खाच्या आवेगात त्यांनी सुऱ्हावर्दीला ‘स्वतःचा भाऊ’ म्हटले. सहस्रो हिंदूंचे शीरकाण झाले असले आणि शेकडो हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले असले, तरी पाच-पंचवीस धर्मांध सुद्धा मेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडील हानी सारखीच झाल्याचे गांधी यांनी म्हटले आणि दंगे थांबवण्याचे कळकळीचे आवाहन केले. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांच्या लेखी हिंदूंच्या जीविताचे अन् हिंदू स्त्रियांच्या अब्रूचे मूल्य इतकेच आहे, हेच स्पष्ट होते.

४. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते धर्मांधांना नव्हे, तर केवळ हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस देणे !

स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या समस्त राजकीय अन् अराजकीय नेत्यांचे पुरोगामित्व, तसेच त्यांची धर्मनिरपेक्षता ही अशी आहे. देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष वगैरे काहीही असली, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते ती राज्यघटना धर्मांधांना समजावण्यास जात नाहीत. हिंदूंना मात्र प्रतिदिन धर्मनिरपेक्षतेची लस टोचली जात आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे; म्हणूनच हिंदूंनी आता सावध होऊन अशा दांभिक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांना सत्तेपासून कायमचे दूर ठेवले पाहिजे.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (११.४.२०२२)