आज सोमवती अमावास्या !

आपल्या परंपरेनुसार सिद्ध, म्हणजे ज्यांना जन्मत:च धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, म्हणजेच अष्टसिद्धी प्राप्त असतात असे सत्पुरुष ! इतिहासात स्वामी समर्थ ते सद्गुरु शंकर महाराज किंवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ते गजानन महाराज, अशी अनेक सिद्धांची उदाहरणे दिसतात. आदिगुरु महादेवांनी स्थापन केलेल्या विविध परंपरातील एक रसेश्वर दर्शन. या परंपरेत ‘रससिद्ध’ व्यक्तीमत्त्व आढळतात. अगस्त्यमुनी ज्यांनी प्रभु श्रीरामचंद्रांना रणभूमीवर ‘आदित्यहृदय’ नामक विजयस्तोत्राचा पाठ प्रदान केल्याचा आणि त्यानंतर रावणाचा वध झाल्याचा संदर्भ रामायणात येतो, ज्यांनी तमिळ भाषेचा विस्तार केल्याची मान्यता आहे, ज्यांनी ‘मर्मकला’ नामक अत्यंत उपयुक्त शास्त्र जगाला दिले, त्या अगस्त्यमुनींनीच सिद्ध नामक औषधी परंपरेचा विस्तार केला. रसशास्त्र हे या परंपरेचे अविभाज्य अंग आहे.

महाराष्ट्रात गोदातीरी नाशिकजवळ अगस्त्यपुरी नामक स्थानी अगस्त्यमुनींचा एक आश्रम होता. आपल्याकडे पुढे नाथ परंपरेच्या माध्यमातून रसशास्त्राचे वहन होत राहिले. ‘सिद्धे रसे करिष्यामि निर्दारिद्यगदं जगत’, म्हणजे ‘रसशास्त्राच्या जोरावर मला समाजाला दारिद्र्य आणि रोगांपासून मुक्ती द्यायची आहे’, असे सांगणारे नागार्जुन नामक सिद्ध आपल्या पैठणक्षेत्री होऊन गेले. रसशास्त्राचा इतिहास तर रोचक आहेच; पण त्याहून रोचक आजच्या नवनवीन रोगांवर आयुर्वेदाच्या सिद्धांतावर विकसित झालेल्या या रसशास्त्राचा करता येणारा प्रभावी उपयोग आहे.

आज (१५ जून २०२६) सोमवती अमावास्या. आपल्या पितरांचे स्मरण करण्याची, त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांना सद्गती लाभण्यासाठी प्रार्थना करण्याची पर्वणी ! त्यासह महादेवांची उपासना करण्याची पर्वणीसुद्धा. या निमित्ताने शैव परंपरेचा भाग असलेल्या रससिद्धांनाही नमन !

नमो भैरवीभैरवाभ्याम् ।

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.