समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !


१. संत समाजावरील सुनियोजित आक्रमण

‘युगानुयुगांपासून हिंदु समाजात संत समाजाचे महत्त्व आहे. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कार्यात ऋषिमुनी, गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत समर्थ रामदासस्वामी आणि चंद्रगुप्ताच्या कार्यात आर्य चाणक्य यांचे योगदान लाभले होते. एवढेच नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याचा मार्गही संतांनी समृद्ध केला होता. संत समाज हा नेहमीच हिंदु समाजाचा कणा राहिलेला आहे. अशा संत समाजावर अतिशय सुनियोजित पद्धतीने आक्रमण केले जात आहे आणि त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत. आज भारतात अनुमाने १६ टक्के मठ आणि मंदिरे यांच्या मूळ भूमीवर ‘भूमी जिहाद’च्या माध्यमातून ताबा मिळवला जात आहे, तसेच जे आश्रम हिंदुत्वाचे कार्य करत आहेत, त्यांच्यावर आघात केले जात आहेत. छत्तीसगडमध्ये माझ्या गुरुदेवांचे तपस्थान पाटेश्वर धाम आहे. तेथेही मागील ४ वर्षांपासून पुष्कळ प्रमाणात आक्रमणे केली जात आहेत.

पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज,

२. साधूसंतांनी समाजात जाऊन लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक !

समाजात वैरागी आणि संन्यासी यांच्यासमवेत गृहस्थाश्रमी संतही आहेत. आपल्याकडे विविध संप्रदाय आहेत. त्यांचेही अनेक संत आहेत. आम्ही संत केवळ मठ-मंदिरांमध्ये बसण्यासाठी बनलेलो नाही. त्यामुळे सर्व संतांनी समाजात जाऊन राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मी स्वत: वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस विविध गावागावांमध्ये जाऊन लोकांमध्ये रहातो.

संतांचा समाजातील सहभाग न्यून झाल्यामुळे समाजाची सुदृढता कमकुवत होऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात समर्थ रामदासस्वामी यांनी भ्रमण करून लोकांमध्ये जागृती केली, तेव्हा कुठे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ‘संतांच्या केवळ क्षणभर दर्शनाने लोकांच्या मनातील विकार दूर होतात.’ संतांच्या वाणीत चैतन्य असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा समाजावर पुष्कळ प्रभाव पडून लोक कृतीशील होतात. त्यामुळे समस्त संत समाजाने आश्रम आणि मठ यांच्या बाहेर पडून लोकांमध्ये गेले पाहिजे.


पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज यांचा परिचय


पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज श्री जांभळी पाटेश्वरदास रेवा महाराज संस्थान, छत्तीसगडचे संचालक आहेत. ते या संस्थानाच्या माध्यमातून धर्मांतर थांबवणे, धर्मांतरितांना स्वधर्मात परत घेणे, गोरक्षण आणि हिंदु धर्मरक्षण करणे यांसाठी संघटितपणे प्रयत्न करतात. ते हिंदु धर्मरक्षणासाठी राज्यभरात युवकांना संघटित करून त्यांना धर्मशिक्षण देण्याचे अभियान चालवत आहेत. ते ‘ऑनलाईन सत्संगा’च्या माध्यमातून लाखो हिंदूंना मार्गदर्शन करतात. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि देशभरात गोवंश हत्याबंदी व्हावी, यांसाठी ते संतांचे संघटन करत आहेत.


३. समाजाला संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ होण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करा !

हिंदूंनी संतांच्या दौर्‍याचे नियोजन करावे. सामाजिक स्तरावर विविध सण-उत्सव साजरे करावे. तेथे संतांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. त्यामुळे संतांविषयी समाजातील नकारात्मक भाव दूर होऊन त्यांच्याविषयी आदर निर्माण होईल. संतांचे संपर्क दौरे दुर्गम गावांमध्ये किंवा आदिवासी भागांमध्ये केल्यास अधिक चांगले होईल. आदिवासींची संतांप्रती श्रद्धा अधिक आहे. आदिवासी बंधूभगिनी वनवासात आपल्या संतांची प्रतीक्षा करतात. संत त्यांना कधी जवळ करतील आणि त्यांना उपदेश देतील, याची त्यांना आस लागलेली असते. मी ४ दिवसांत १४ गावांमधून प्रवास केला. या १४ गावांमध्ये मला केवळ ३ ठिकाणी व्यासपीठ मिळाले, इतर ठिकाणी मी पिंपळाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या बागेत बसून लोकांना मार्गदर्शन केले. त्या वेळी तेथे सहस्रोच्या संख्येत लोक गोळा झाले होते आणि ते धर्मकार्य करण्यास उत्सुक होते.

४. सार्वजनिक उत्सवांमध्ये संतांना आमंत्रित केल्यास युवकांवर चांगले संस्कार होतील !

जोपर्यंत हिंदु राष्ट्र्राची संकल्पना साकार होत नाही, तोपर्यंत आपल्याला सक्रीय रहाण्याची आवश्यकता आहे. आपण वर्षभरात ३६५ महोत्सव साजरे करू शकतो. पूर्वी इस्लाममध्ये केवळ ३ सण होते, आज त्यांनी बळजोरीने ३० उत्सव केले आहेत. ज्या काळात हिंदु सण उत्सव असतात, त्याच वेळी नेमके तेही सण उत्सव साजरे करत असतात. आपण कितीही सण उत्सव साजरे केले, तरी ते अल्पच पडतील. त्यादृष्टीने व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी थोडाफार आर्थिक त्याग करावा लागला, तरी चालेल; पण तो करावा. हा त्याग केवळ आतासाठी नसून पुढे सहस्रो वर्षांपर्यंत रहाणार्‍या हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी असणार आहे. हा दृष्टीकोन ठेवून हिंदूंनी त्यांच्या मिळकतीतील काही भाग हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी द्यावा.

नेहमी सण-उत्सव साजरे केले, तर आपल्यासमवेत तरुण पिढी येईल. गल्लीबोळांमध्ये १००-२०० कार्यक्रम होऊ लागल्यावर आपल्या पिढीला चांगले संस्कार मिळतील. किशोरवय संस्कारासाठी महत्त्वपूर्ण असते. या वयात त्यांच्या डोक्यात नास्तिकतेचे विष पेरले जाते. अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार होतील.’

– पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान, पाटेश्वर धाम, छत्तीसगड.