श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी

पुणे – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ (वारसास्थळ) विकसित करण्यात येत आहे. मूळ गावापासून १५० मीटर अंतरावर साडेदहा एकर भूमीवर ही ‘हेरिटेज वाडी’ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वास्तूशैली आणि आधुनिक सुविधा यांचा समन्वय साधला जाणार आहे. यामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. या ‘हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या भूमीची पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १३ जून या दिवशी केली.

        मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेली सूत्रे

१. ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. या परिसरातील १५० घरांना अन्य ठिकाणी जागा देऊन चांगल्या गावाची रचना केली जाईल. भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था पालटेल.

२. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बसस्थानक आदींचे नियोजन करण्यात आले आहे. या सुविधांमुळे भाविकांची संख्याही वाढेल.

३. भीमाशंकर मंदिराचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व यांचा विचार करून विकास अन् संवर्धन यांचा समतोल राखला जाईल.