नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !

केनियाची राजधानी नैरोबी येथील ‘जोको केन्याटा इंटरनॅशनल एअरपोर्ट’चा विस्तार आणि नूतनीकरण यांचे २ बिलियन डॉलर्सचे (१९ सहस्र कोटी रुपयांचे) काम भारतीय उद्योगपती अदानींच्या कंपनीला देण्यात आले होते. त्या वेळी ‘या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे, या प्रकल्पासाठी अदानींना अवाजवी किंमत मोजली जाणार आहे…’, अशी कारणे पुढे करून सामाजिक माध्यमांवर एक प्रचंड आणि योजनाबद्ध मोहीम चालू करण्यात आली. केनियातील नागरिकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू झाले. जगभरातील ‘सेलिब्रिटीज’नी (वलयांकित व्यक्तींनी) पर्यावरणाच्या नावाखाली या प्रकल्पाला कडवा विरोध घोषित केला. ‘ग्लोबलिस्ट-इस्लामिस्ट-कम्युनिस्ट (GLISCO) डीप स्टेट’ने जगभर रान उठवले. (जागतिक धोरणांचा पुरस्कार करणारे, इस्लामवादी आणि साम्यवादी यांच्या यंत्रणेने) या दबावामुळे केनियाच्या ‘ॲव्हिएशन वर्कर्स युनियन’ने हा प्रकल्प रहित व्हावा, म्हणून संप केला. या जागतिक मोहिमेचा दबाव इतका टिपेला गेला की, केनियाच्या सरकारला हा प्रकल्प रहित करण्याविना पर्यायच उरला नाही.

१. भारतविरोध आणि चीनचा लाभ

आता हाच प्रकल्प ‘चायना कम्युनिकेशन्स कन्स्ट्रक्शन कंपनी’कडे सोपवण्यात आला आहे. यासाठी तिला २.९ बिलियन डॉलर्स (२७ सहस्र कोटी रुपये), म्हणजे अदानींच्या अधिक किंमत मोजली जाणार आहे. प्रकल्प तोच, पर्यावरणावर होणारा परिणामही तोच, किंमत दीडपट आणि तरीही या वेळी मात्र कुणी विरोधाचा शब्दही उच्चारलेला नाही, म्हणजेच मुखवटा पर्यावरणप्रेमाचा असला, तरी चेहरा मात्र ‘भारतविरोध आणि चीनचा लाभ’ हाच आहे.

२. भारताला विरोध आणि चीनचा प्रभाव वाढण्यामागील कारणे या प्रकरणात २ सूत्रे लक्षात घेण्यासारखी आहेत.

श्री. अभिजित जोग

अ. मोहिमेमागचा खरा हेतू शोधायला हवा ! : पहिले म्हणजे, हा प्रकल्प रहित व्हावा म्हणून केनियातील संसद आणि न्यायालय यांसारख्या घटनात्मक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न न करता तथाकथित स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अधिवक्ता गट या पर्यायी राजकारणाच्या (Alternative politics) मार्गाने रान उठवण्यात आले. जगभरात कुठेही स्वतःसाठी गैरसोयीचे ठरतील, असे निर्णय घेतले गेल्यास ते पालटण्यासाठी आणि वेळ पडल्यास आपल्याला नको असलेली सरकारे उलथवून टाकण्यासाठी याच मार्गाचा अवलंब ‘ग्लोबलिस्ट-इस्लामिस्ट-कम्युनिस्ट (GLISCO) डीप स्टेट’कडून केला जातो; म्हणूनच लोकशाही आणि पर्यावरण अशा आकर्षक मुखवट्यांमागे जर अचानक सामाजिक माध्यमांवर मोहीम चालू झाली, तिचा आवाज टिपेला नेण्यात जागतिक माध्यमे, सेलिब्रिटीज, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक आंदोलनात चमकणारे आंदोलनजीवी… हे अहमहमिकेने सहभागी होतांना दिसले, तर या प्रचाराला न फसता या मोहिमेमागचा खरा हेतू काय आहे, याचा शोध घ्यायला हवा. भारताचे अर्थकारण आणि सुरक्षा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘ग्रेट निकोबार प्रकल्पा’ला असाच हेतूपुरस्सर विरोध चालू झाला आहे. त्याचा आवाज वाढत जाईल, तेव्हा केनियातील प्रकल्पाविषयी काय घडले, हे लक्षात ठेवायला हवे.

आ. चीनचा प्रभाव : दुसरे म्हणजे केनियावरील चीनचा प्रभाव या प्रकल्पामुळे वाढणार आहे. असे मोठे प्रकल्प आणि ते पूर्ण करणारे उद्योग हे देशाच्या ‘सॉफ्ट पॉवर’ला (बळाचा वापर न करता स्वतःला अपेक्षित असलेले साध्य करणे) हातभार लावत असतात; म्हणूनच प्रत्येक देश आपल्या उद्योगांना अधिकाधिक पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्या वेळी ते ‘गूगल’, ‘ब्लॅकरॉक’ अशा अनेक अमेरिकन उद्योगांचे मंडळच घेऊन गेले. जगातील विमानतळे, बंदरे अशा महाकाय पायाभूत प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यांना चीनचे सरकार पाठिंबा तर देतेच; पण अशा प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांशी अत्यंत प्रभावी स्पर्धा करणार्‍या अदानी समुहाविरुद्ध ‘डीप स्टेट’च्या साहाय्याने कारवायाही करते.

३. काँग्रेसला चीनचे समर्थन का करावे लागते ?

दुर्दैवाने या कारवायांमध्ये भारतातील काँग्रेस पक्ष आणि त्यांची दरबारी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) नेहमीच चीनच्या बाजूने उभी असते. केनियातील या प्रकल्पाविरोधात मोहीम चालू होती, त्या वेळी काँग्रेसचे जयराम रमेश इत्यादी नेते पर्यावरणाचा मुद्दा घेऊन अदानींवर भरपूर तोंडसुख घेत होते. चीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जो गुप्त समझोता झाला आहे, त्यात असे कोणते मुद्दे आहेत की, काँग्रेसला नेहमीच भारतविरोधी भूमिका घेऊन चीनचे समर्थन करावे लागते ?

४. भारतविरोधी चेहरा

ते काहीही असले, तरी ज्यांना लोकशाही व्यवस्था आणि संवैधानिक मार्ग यांविषयी श्रद्धा आहे, त्यांनी पर्यायी राजकारणाच्या अराजकतावादी मार्गाला ठाम विरोध करायला हवा; कारण हे स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची ओळख धूसर असते, त्यांच्या मागील जागतिक यंत्रणा अत्यंत गुंतागुंतीची असते, त्यांच्या निधीचे स्रोत अज्ञात असतात, कुठल्याही घटनात्मक प्रक्रियेशी त्यांची बांधीलकी नसते आणि त्यांच्या निष्ठा बहुतेक वेळा देशाबाहेर असतात. त्यांचे मुखवटे आकर्षक असले, तरी चेहरा मात्र भारतविरोधाचाच असतो.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१२.६.२०२६)