‘पू. भार्गवराम यांची २ दिवसांत शाळा चालू होणार होती. त्यामुळे मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही शाळेत जाऊन काय करणार ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला अभ्यास करून प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पुष्कळ सेवा करायची आहे.’’ नोव्हेंबर २०२१ या मासापासून पू. भार्गवराम प्रभु शाळेत जाऊ लागले.
१. पू. भार्गवराम प्रभु यांचा शाळेतील पहिला दिवस
१ अ. शाळेत गेल्यावर त्वरित आईचा हात सोडून शिक्षकांचा हात धरून वर्गात जाणे : शाळेच्या पहिल्या दिवशी पू. भार्गवराम यांना शाळेत घेऊन जातांना आम्हा सर्वांना वाटत होते, ‘पू. भार्गवराम आम्हाला सोडून जाणार नाहीत.’ प्रत्यक्षात पू. भार्गवराम यांना शाळेत घेऊन गेल्यावर त्यांनी त्वरित माझा हात सोडून शिक्षकांचा हात धरला आणि ते वर्गात गेले. (अनोळखी शिक्षकांचा लहान मुले हात धरत नाहीत. – संकलक)
१ आ. रडणाऱ्या मुलांना हात धरून वर्गात घेऊन जाणे : वर्गाच्या बाहेर लहान मुले रडत होती. तेव्हा पू. भार्गवराम वर्गाच्या बाहेर आले आणि बाहेर असणाऱ्या दोन मुलांचा हात धरून ते त्यांना वर्गात घेऊन गेले.
२. पू. भार्गवराम प्रभु यांचा शाळेतील दुसरा दिवस
२ अ. रडत असलेल्या लहान मुलीला समजावणे : दुसऱ्या दिवशी ते शाळेत गेल्यावर ‘एक लहान मुलगी रडत आहे’, असे त्यांना दिसले. पू. भार्गवराम यांनी तिला पाणी प्यायला देऊन शांत केले. त्यांनी त्या मुलीला सांगितले, ‘‘तू रडू नको. आपण मिळून खेळू.’’
२ आ. गुणग्राहकता : पू. भार्गवराम यांनी आम्हाला सांगितले, ‘‘शाळेत आम्हाला सांभाळणाऱ्या मावशी (आया) चांगल्या आहेत. त्या केवळ मलाच नाही, तर सर्व मुलांना साहाय्य करतात.’
२ इ. गुरुदेवांप्रती भाव
२ इ १. पू. भार्गवराम यांनी त्यांच्या आईला ‘गुरुदेव आपल्या समवेत असतांना मुले शाळेत का रडतात ?’, असे विचारणे : दुसऱ्या दिवशी पू. भार्गवराम शाळेतून घरी आल्यावर आमच्यात पुढील संभाषण झाले.
पू. भार्गवराम प्रभु : आपल्या समवेत गुरुदेव सदैव असतात ना ! मग मुले का बरे रडतात ?
मी (सौ. भवानी प्रभु) : त्या मुलांना गुरुदेवांविषयी ठाऊक नाही.
पू. भार्गवराम प्रभु : त्यांना गुरुदेवांविषयी का ठाऊक नाही ?
मी : मुलांच्या आई-वडिलांनाही गुरुदेवांविषयी ठाऊक नाही. त्यामुळे त्यांना सांगणारे कुणी नाही.
पू. भार्गवराम प्रभु : मी त्यांना सांगेन की, गुरुदेव म्हणजे विष्णु आहेत आणि ते आपल्या समवेत असतात; म्हणून आपल्यापैकी कुणीही रडायचे नाही.
३. पू. भार्गवराम प्रभु यांचा शाळेतील तिसरा दिवस
३ अ. पू. भार्गवराम यांनी त्यांच्या गळ्यातील श्रीकृष्णाचे चित्र असलेले पदक शाळेतील मुलांना दाखवून त्यांना ‘हे नेहमी आमच्या समवेत असतात’, असे सांगणे : पू. भार्गवराम शाळेतून घरी आल्यानंतर मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सर्वांना गुरुदेवांविषयी सांगितले का ?’’ तेव्हा पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘मी त्यांना सांगितले; परंतु त्यांना ते समजले नाही. नंतर मी त्यांना माझ्या गळ्यातील पदक (‘लॉकेट’) दाखवून सांगितले, ‘‘हे नेहमी आमच्या समवेत असतात.’’ (पू. भार्गवराम यांच्या गळ्यात श्रीकृष्णाचे चित्र असलेले पदक (लॉकेट) असते.)
४. शाळेतून आल्यावर त्रास होत असतांना आईला आवरण आल्याचे सांगून उपाय करणे आणि त्यानंतर पू. भार्गवराम यांना बरे वाटणे
शाळेत जाणे, हे त्यांच्यासाठी एक नित्यकर्माप्रमाणे असते. शाळेत जाऊन आल्यावर काही वेळा त्यांना त्रास होतो, तरीही त्यांचे त्याविषयी कधी गाऱ्हाणे नसते. कधी कधी पू. भार्गवराम सांगतात, ‘‘शाळेत मुले रडतात, ओरडतात किंवा एकमेकांना मारतात आणि भांडतात, हे मला आवडत नाही.’’ अशा प्रसंगांत किंवा त्यांना त्रास झाल्यावर त्यांचा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो. एक दिवस शाळेतून आल्यावर त्यांची पुष्कळ चिडचिड होत होती. मी त्यांची दृष्ट काढल्यावर पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘आज शाळेत माझ्यावर पुष्कळ आवरण आले आहे. त्यामुळे मला अनिष्ट शक्तींचा त्रास होत आहे.’’ त्यानंतर त्यांनी उपाय आणि नामजप केल्यावर त्यांना बरे वाटले.
(‘साधारण या वयातील मुलांना शाळेतील काही आवडले नाही किंवा पटले नाही, तर त्यांचा शाळेत न जाण्याकडे कल असतो; परंतु पू. भार्गवराम यांचा ‘शिकून पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायची आहे’, असा दृष्टीकोन असल्याने ते त्रासदायक स्थितीकडेही उपायात्मक किंवा साधनेच्या दृष्टीने पहातात. हे त्यांच्या वयाच्या दृष्टीने कौतुकास्पद असून त्यांचे विचार त्यांचे संतत्व दर्शवतात.’ – संकलक)
५. प्रगल्भता
आम्ही कधी बाहेर गेल्यास पू. भार्गवराम नेहमी फळांचा रस किंवा आईस्क्रीम मागतात; मात्र शाळेतून घरी जातांना आम्ही आईस्क्रीमच्या दुकानासमोरून जात असलो, तरी ते काहीच मागत नाहीत. त्या वेळी ‘ते फिरायला जातांना खायला मागतात; परंतु शाळेतून येतांना त्यांचा ‘स्वतःला चांगले व्हायचे आहे’, असा दृष्टीकोन असल्याने ते काहीच मागत नाहीत’, असे माझ्या लक्षात आले.
‘पू. भार्गवराम यांच्या लीला पहातच रहाव्यात’, असे मला वाटते. गुरुदेव, आम्हाला अशा जिवाच्या लीलांचे साक्षीदार बनवलेत, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू,कर्नाटक. (१९. १२. २०२१)