(म्हणे) ‘सत्तेत असलेल्या लोकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा प्रचार केला !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्यासमवेत संबंध असल्याने मलिक यांना कारागृहात जावे लागले आहे. याविषयी शरद पवार का बोलत नाहीत ? त्यांनी नवाब मलिक यांची पक्षातून हकालपट्टी का केली नाही ? याचे उत्तर शरद पवार यांच्याकडे आहे का ? – संपादक

  • आतंकवाद्यांच्या धमक्यांमुळे काश्मीरमधून ४ लाखांहून अधिक हिंदूंनी पलायन केले. जे पंडित आणि हिंदू काश्मीरमध्ये राहिले, त्यांची आतंकवाद्यांनी हत्या केली. त्या वेळी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारने काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. काश्मिरी पंडितांना स्वतःच्याच देशात विस्थापित म्हणून रहावे लागले, हे देशाचे दुर्दैवच ! – संपादक

अमरावती – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात हिंदूंचा छळ कसा करण्यात आला आहे ?, हे दाखवले आहे. जेव्हा लहान समुदाय समस्यांनी घेरला जातो, तेव्हा बहुसंख्य त्यांच्यावर आक्रमण करतात. हिंदूंवरील अत्याचारांवर एका माणसाने चित्रपट सिद्ध केला. बहुसंख्य नेहमीच अल्पसंख्यांकांवर आक्रमण करतात, हे यावरून दिसून येते. मुसलमान बहुसंख्य असतांना हिंदु समाजाला असुरक्षित वाटते. सत्तेतील लोकांनी या चित्रपटाचा प्रचार केला, हे दुर्दैवी आहे. (शरद पवार यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे बहुसंख्यांकांना लक्षात येत नाही. – संपादक) धार्मिक आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी उधळली आहेत. अमरावती येथे ९ एप्रिल या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली. (देशात मुसलमानबहुल राज्यातील धर्मांधांनी तेथील हिंदूंवर केलेल्या आजवरच्या अत्याचारांविषयी शरद पवार मूग गिळून गप्प का आहेत ? – संपादक)

शरद पवार म्हणाले की, आज असुरक्षितता निर्माण करण्याविषयी सुनियोजित कारस्थान केले जात आहे. देशातील जातीय परिस्थिती बिघडत चालली आहे. (देशातील जातीय परिस्थिती बिघडण्यास ७० वर्षांपासून सत्तेवर असणारा काँग्रेस पक्षच उत्तरदायी आहे. हे सत्य जाणूनबुजून लपवण्यासाठी शरद पवार वक्तव्य करत आहेत. – संपादक) काश्मिरी पंडितांवरील आक्रमणांच्या दायित्वापासून भाजप पळू शकत नाही. आज हिंदुआणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही गंभीर गोष्ट आहे. ज्यांना सामाजिक हित जपायचे आहे, त्यांनी पुढे यावे. (आतापर्यंत धर्मांधांनीच जातीय दंगली घडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे हिंदू ओळखून आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्यांना झुकते माप देत केवळ हिंदूंवर टीका करणारे शरद पवार ! – संपादक)