नागपूर येथील ९९ वर्षे पूर्ण केलेल्या पोद्दारेश्वर मंदिरात श्रीरामजन्मोत्सव साजरा !

पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरातील श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती

नागपूर – विदर्भातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरात या वर्षी राम जन्मोत्सवाचा उत्सव पुष्कळ उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. २ वर्षांनंतर भक्तांच्या उपस्थितीत ‘राम जन्मोत्सव’ साजरा होत आहे. पोद्दारेश्वर श्रीराम मंदिराला या वर्षी ९९ वर्षे पूर्ण झाल्याने भक्तांमध्ये उत्साह होता. पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर हे केवळ नागपूरचे नव्हे, तर विदर्भाची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखच झाले आहे. मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य शोभायात्रेचा वारसाही या मंदिराने जोपासला आहे.

मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मण यांची मूर्ती दृष्टीस पडते. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. मंदिरात हनुमान, विष्णु, लक्ष्मी, गरूड, सुग्रीव, गंगा आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. जयपूर येथील गोविंदराम उदयराम यांनी या मूर्ती घडवल्या आहेत. अष्टकोनी सभामंडप मंदिराची शोभा वाढवतो. पितळ आणि लाकूड यांचा वापर करून मंदिराचे द्वार सिद्ध करण्यात आले आहे.

ऐतिहासिक शोभायात्रा रहित !

पोद्दारेश्वर श्रीराम मंदिराची ऐतिहासिक भव्य शोभायात्रा या वर्षीही रहित करण्यात आली. गेली २ वर्षे कोरोनामुळे शोभायात्रेचे आयोजन रहित करण्यात आले होते; मात्र या वर्षी सर्व निर्बंध हटवण्यात आल्यानंतरही यावर्षीची शोभायात्रा रहित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संबंधित सर्व निर्बंध हटवण्याच्या सूचना निघाल्यानंतर श्रीरामजन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला होता. इतक्या अल्प दिवसांत शोभायात्रेची सिद्धता करणे शक्य नसल्यामुळे या वर्षी शोभायात्रेचे आयोजन रहित करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.