अखेर अध्यादेश निघाला, मुंबईकरांच्या लढ्याला यश ! – आशिष शेलार, नेते, भाजप
मुंबई, १० एप्रिल (वार्ता.) – मुंबई उपनगरातील रहिवाशांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटिसींना स्थगिती देणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याविषयी भाजपच्या पाठपुराव्याला यश आले असून मुंबई उपनगरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी ८ एप्रिल या दिवशी दिली आहे.
मुंबई उपगरात रहाणाऱ्या अनुमाने ६० सहस्रांहून अधिक नागरिकांना शासनाकडून अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसा अन्यायकारक आहेत, याकडे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधून शासनाकडे पत्रव्यवहारही केला होता, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी लक्षवेधी सूचना मांडून हा विषय ऐरणीवर आणला होता. ज्या वेळी उपनगरामध्ये इमारती, चाळी आणि अन्य रहिवासी बांधकामे करण्यात आली, त्या वेळी प्रत्येक बांधकामाने अकृषिक कर भरला. त्यानंतरही प्रत्येक वेळी त्यांना या कराच्या नोटीसा बजावल्या जातात.
या नोटिसा पूर्वीच्या दरापेक्षा १ सहस्र ५०० टक्के अधिकच्या दराने बजावण्यात आल्या असून त्या अवाजवी आहेत. कोरोनामुळे एकीकडे रहिवाशांचे अर्थकारण बिघडले असतांना अशा प्रकारचा भुर्दंड सरकारद्वारे लादला जात आहे, तसेच अशा प्रकारचा कर मुंबई शहरातील सोसायट्यांना नाही, केवळ उपनगरातील बांधकामांना आकारण्यात येत असून ‘एकाच शहरात २ नियम कसे ?’, असा प्रश्नही आमदार शेलार यांनी उपस्थित करून शासनाने तातडीने या नोटिसांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला होता.