भारताने रशियाच्या बाजूने आणि युक्रेनच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य !

भारताने युक्रेनच्या विरोधात घेतलेली भूमिका जाणून त्याला देशवासियांनी पाठिंबा देणे आवश्यक !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्याला आता ४५ दिवस होत आहेत. बघता बघता कथित मोठ्या आणि सामर्थ्यशाली अमेरिका अन् युरोप यांच्या अब्रूच्या चिंध्या करत रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानी बाहेर येऊन ठेपले आहे. आज अमेरिका आणि अन्य देश भारताला नैतिकतेचे डोस पाजत ‘भारताने रशियाचा निषेध करावा आणि त्याच्यावर दबाव आणावा’, यासाठी प्रयत्नरत आहेत. असे असूनही भारत त्यास डगमगलेला नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण फक्त नैतिकतेवर चालत नाही. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही असते आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण धागे या लेखाद्वारे देत आहे.

१. युक्रेनचे भारताशी आतापर्यंतचे कटू वागणे

अ. वर्ष १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अणूचाचणी केली, तेव्हा भारतावर कडक निर्बंध घालणारा देश होता युक्रेन !

आ. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताविरुद्ध मतदान करणारा देश होता युक्रेन !

इ. पाकिस्तानला शस्त्रास्त्र विकणारा देश आहे युक्रेन !

ई. भारताला ‘संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी करू नये’, असे म्हणणारा देश आहे युक्रेन !

उ. वर्ष २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांत काश्मीरप्रश्नी भारताविरुद्ध मतदान करणारा देश आहे युक्रेन !

२. अमेरिकेने युक्रेनला युद्ध करण्यास भाग पाडणे आणि कोणत्याही देशाने युक्रेनला युद्धात प्रत्यक्ष साहाय्य न करणे

रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आज युरोपला भारताची नितांत आवश्यकता आहे. जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी एक मोठे नेतृत्व आहे. ‘जर भारताने यामध्ये हस्तक्षेप केला, तर पुतिन त्यावर नक्कीच विचार करतील आणि या युद्धाला कुठेतरी पूर्णविराम मिळेल’, हे युरोप चांगलेच जाणून आहे; कारण भारताचे रशियाशी पुष्कळ जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. युक्रेनला ‘लढ म्हणणाऱ्या’ त्याच्या मित्रांनीच त्यांना दगाफटका केला आहे. शहरेच्या शहरे बेचिराख होत असतांना युरोपीय देश कुणीही युक्रेनच्या साहाय्याला आले नाही. युक्रेनने जगातील प्रत्येक देशाकडे साहाय्याचा हात मागितला; मात्र कुणीही पुढे आले नाही. आर्थिक आणि शस्त्रास्त्र यांचे साहाय्य घोषित करून अमेरिका नाममात्र निराळा राहिला. सध्या चालू असलेल्या युद्धात रशियाने युक्रेनची अक्षरश: चाळण केली; मात्र कोणत्याही देशाने प्रत्यक्ष सैन्य युक्रेनच्या साहाय्याला पाठवलेले नाही. युरोपीय देशांनी विशेषतः अमेरिकेने युक्रेनला या युद्धासाठी भाग पाडले आणि त्याची अवस्था आज संपूर्ण जग पहात आहे.

३. रशियाने भारताला १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात अमेरिका आणि ब्रिटीश युद्धनौका रोखण्यासाठी साहाय्य करणे

भारत जेव्हा जेव्हा अडचणीत आला, तेव्हा त्याच्या साहाय्याला केवळ रशिया धावून आला. त्यासाठी ५० वर्षांपूर्वीची विस्मृतीत गेलेली घटना जाणून घेऊया.

डिसेंबर १९७१ मध्ये भारत बांगलादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध सर्व शक्तीनिशी उतरला होता. पाकिस्तानचा मित्र असलेल्या अमेरिकेने भारताला धमकी दिली होती की, युद्ध थांबवावे, अन्यथा त्याचे अत्यंत वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील. सावध होऊन भारताने रशियाला साहाय्याचा संदेश पाठवला. जेव्हा पाकिस्तानचा पराभव होणार, हे स्पष्ट दिसू लागले, तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी राष्ट्र्रपती रिचर्ड निक्सन यांना सांगून अमेरिकेची सर्वांत मोठी आण्विक विमानवाहू नौका बंगालच्या उपसागरात पाठवायचे ठरवले. हे जहाज त्या वेळी जगातील सर्वांत मोठे ९४ सहस्र टन वजनी जहाज होते. त्याची क्षमता ९० लढाऊ विमाने वाहून नेण्याची होती. याच्या तुलनेत भारताकडे होते १९ सहस्र ५०० टन वजनी ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ ज्याची विमान वाहून नेण्याची क्षमता होती जवळपास २१ ते २३ विमानांची !

अमेरिकन जहाजाचा हेतू होता बांगलादेश मुक्त होण्यापासून थांबवणे. दुर्दैवाने लवकरच भारताला अजून एक वाईट बातमी मिळाली. रशियन गुप्तहेर खात्याने भारताला सावध केले की, ब्रिटीश नौदलही त्यांची पुष्कळ आरमारी जहाजे अरबी समुद्रात पाठवत आहे. ज्याचे नेतृत्व ‘एच्.एम्.एस्. इगल (आर्.आर्.०५) हे ३० ते ३५ विमाने वाहून नेण्याची क्षमता असलेले ५५ सहस्र टन वजनाचे ब्रिटीश विमानवाहक जहाज आणि कमांडो कॅरियर अलबियॉन करत आहे. भारताची अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अशी दोन्ही बाजूने कोंडी करण्याचा ब्रिटीश आणि अमेरिकी नौदलाचा दुहेरी डाव होता. अशा प्रकारे जगातील २ आघाडीचे लोकशाही देश जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही असलेल्या देशाला धमकावत होते. तेव्हा भारताने तातडीने साहाय्य करण्याचा संदेश मॉस्कोला पाठवला. रशियाच्या नौदलाने तात्काळ १६ आरमारी जहाजे आणि ६ आण्विक पाणबुड्या व्लॅडिवॉस्टॉक येथून रवाना केल्या. ज्याचा हेतू होता अमेरिकेला थोपवणे. ॲडमिरल एन्. कृष्णन जे तत्कालीन नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते, त्यांनी त्यांचे पुस्तक ‘नो वे बट सरेंडर’ (NO WAY BUT SURRENDER) मध्ये लिहिले आहे की, त्यांना एक गोष्ट सतावत होती की, अमेरिकन युद्धनौका चितगाँग बंदरावर आक्रमण करील. म्हणून त्यांनी ‘मारो अथवा मरो’, या इर्षेने एक योजनाही बनवली होती. डिसेंबर १९७१ च्या दुसऱ्या आठवड्यात महाकाय अमेरिकी युद्ध नौका बंगालच्या उपसागरात येऊ लागली आणि ब्रिटीश युद्धनौका अरबी सागराकडे निघाल्या. संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला की, आता महायुद्ध पेटते की काय ? पण अमेरिकी युद्धनौका अनभिज्ञ असतांनाच अचानक बंगालच्या उपसागरात त्यांनी रशियन आण्विक पाणबुड्या पाहिल्या, ज्या त्यांची वाट अडवून उभ्या होत्या. अमेरिकन युद्धनौकेवरील सैनिकांना धक्का बसला. ॲडमिरल गॉर्डनने कळवले, ‘आपल्याला उशीर झाला. रशियन आधीपासूनच इथे उभे आहेत.’ अमेरिकन आणि ब्रिटीश नौदलाने आल्या पावली माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

४. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मतदानाच्या वेळी तटस्थ रहाण्याची घेतलेली भूमिका अगदी योग्य !

आज ही घटना विस्मृतीत गेली आहे. यातून आपल्याला खरा मित्र कोण आहे, हे कळेल. त्यामुळे युक्रेनचा जयजयकार किंवा त्याला होणाऱ्या हानीविषयी अधिक खंत करत बसू नका. माणुसकीची पुष्कळ मोठी किंमत भारतालाही चुकवावी लागली आहे. भारताचा ५० वर्षे जुना मित्र रशिया आहे आणि म्हणून भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मतदानाच्या वेळी तटस्थ रहाण्याची घेतलेली भूमिकाही अगदी योग्य आहे. या सर्वांतून अमेरिकेचा दुसरा चेहरा जगासमोर आला आणि त्याच्या महासत्ता होण्याच्या सुप्त इच्छा रशियाने धुळीस मिळवल्या.

लेखक – एक निवृत्त नौदल कमांडर

(साभार – सामाजिक संकेतस्थळ)