शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या काही मालमत्ता आर्थिक घोटाळ्यातील पैशांतून खरेदी केलेल्या आहेत ! – अंमलबजावणी संचालनालय

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नुकत्याच कह्यात घेतलेल्या मालमत्ता या आर्थिक घोटाळ्यातून जमवलेल्या काळ्या पैशांतून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने प्रवीण राऊत यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या विरोधात नुकतेच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात हे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. प्रवीण राऊत यांच्याकडील कागदपत्रांच्या अन्वेषणात वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी भागीदारीत अलीबागमध्ये अनेक जागा विकत घेतल्याची कागदपत्रे सापडली. यांतील काही मालमत्ता कह्यात घेतल्याची माहिती अन्वेषण यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

‘अवनी इंफ्रास्ट्रक्चर्स’ या आस्थापनात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत या भागीदार आहेत. या आस्थापनात इतर भागीदारांसोबत सांताक्रूझ येथे टुलिप रेसिडेंसी नावाची इमारत बांधली. यात वर्षा राऊत यांची गुंतवणूक ५ सहस्र ६२५ रुपये इतकी दाखवण्यात आली. माधुरी राऊत यांची गुंतवणूक १३ लाख ५ सहस्र रुपये इतकी दाखवण्यात आली; मात्र ‘या प्रकल्पातून दोघींना प्रत्येकी १४ लाख रुपये नफा झाल्याची नोंद कशी ?’, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. पालघरमधील एका भूखंडाच्या व्यवहारातून प्रवीण राऊत यांना मिळालेले ४५ कोटी आणि वर्ष २००८ ते २०१० या काळात वाधवान यांच्या एच्.डी.आय.एल्.कडून अनेक हफ्त्यांत आलेले ११२ कोटी कसले ?, याचे उत्तरही प्रवीण राऊत देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे गोरेगावच्या पत्रा चाळ प्रकल्पातून आलेले ५० कोटी रुपये हा तर केवळ या भ्रष्टाचाराच्या तपासातील प्रारंभ होता, असा दावा संचालनालयाने या आरोपपत्रातून केला आहे.