‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत कार्यान्वित होणार्‍या ग्रंथालयाच्या संदर्भातील सेवेत सहभागी व्हा !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ म्हणजे विद्यार्थ्यांना १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देणारे अनोखे विद्यालय ! तक्षशीला, नालंदा, काशी, भोजशाला आदी प्राचीन विद्यापिठांप्रमाणे जगाला मार्गदर्शन करणारे हे विद्यालय असणार आहे. ‘या विद्यालयामध्ये राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ विद्यार्थी घडावेत’, या उद्देशांनी विद्यार्थ्यांना १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाबरोबर अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांचेही शिक्षण दिले जाणार आहे. या विश्वविद्यालयाच्या अंतर्गत भव्य ग्रंथालयाची उभारणी करण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला पूरक अशा विषयांचे विविध भाषांमधील संदर्भ ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.

आतापर्यंत विश्वविद्यालयाच्या अंतर्गत अध्यात्म, धर्म, राष्ट्र, कला, आयुर्वेद आदींसारख्या विविध विषयांची ग्रंथसंपदा संग्रही ठेवण्यात आली आहे. या ग्रंथभांडारात ३५ सहस्रांपेक्षा अधिक मुद्रित ग्रंथ आणि १ लाखांहून अधिक ‘ई-बूक्स’ असून दिवसेंदिवस यात अनेक ग्रंथांची भर पडत आहे. त्यामुळे या ग्रंथांच्या संदर्भातील पुढील सेवा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील आश्रमामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

१. ३,५०० मुद्रित ग्रंथ आणि १ लाखांहून अधिक ‘ई-बूक्स’ यांच्या संगणकीय नोंदी (ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक आदी माहितीसह ग्रंथांचा थोडक्यात सारांश २० ते २५ शब्दांमध्ये नोंदवणे) करणे

२. ३,५०० ग्रंथांना संकेतांक (कोड) देणे

(संकेतांक देणे : ग्रंथांना वेगवेगळ्या बारकाव्यांनुसार विशिष्ट संकेतांक दिले जातात आणि सर्व ग्रंथ संग्रही ठेवले जातात. संकेतांकांमुळे संग्रहात ठेवलेले ग्रंथ आवश्यकतेनुसार साठ्यातून शोधणे सोपे जाते. त्यामुळे ग्रंथांना संकेतांक देणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.)

३. संकेतांक झालेल्या २० सहस्र ग्रंथांची संकेतांकानुसार विभागणी करणे, त्यांची विषयांनुसार सूची अद्ययावत करणे

४. ग्रंथांच्या साठ्यात काही ग्रंथांच्या एकापेक्षा अधिक प्रती आहेत. या अतिरिक्त प्रतींची आवक-जावक पहाणे आणि त्यांची सूची बनवणे

५. बांधणी सुटलेल्या आणि पाने निखळलेल्या ग्रंथांची बांधणी करणे, तसेच त्यांची निगा राखणे

वरील सेवांसाठी मराठी आणि इंग्रजी या भाषांचे, तसेच संगणकाचे प्राथमिक ज्ञान, ग्रंथांची अनुक्रमणिका वा प्रस्तावना वाचून त्या ग्रंथाचा सारांश लिहिणे आदी कौशल्य आवश्यक आहे.

सेवा करण्यास इच्छुक असल्यास; परंतु सेवेचे कौशल्य नसल्यास या सेवांच्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. इच्छुकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती श्री. अभिजित सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१

सनातन धर्मातील अनमोल ज्ञानभांडार अखिल मानवजातीला प्राप्त व्हावे, यासाठी ग्रंथालयाच्या सेवांमध्ये सहभागी व्हा !