कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा ५ राज्यांना सतर्क रहाण्याचा सल्ला !

नवी देहली – देशातील काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देहली, हरियाणा, मिझोराम, महाराष्ट्र आणि केरळ सरकारांना पत्र लिहून सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याच्या कारणांचा गांभीर्याने शोध घेण्यास सांगितले आहे. तसेच आवश्यक असल्यास कोविड-१९ विषयी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असेही म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ घंट्यांत केरळमध्ये ३५३, महाराष्ट्रात ११३, हरियाणामध्ये ३३६ आणि मिझोराममध्ये १२३ रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे १ सहस्र १०९ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

१८ वर्षे वयोगटावरील सर्वांना मिळणार वर्धक मात्रा !

केंद्रशासनाने घोषित केले आहे की, १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना १० एप्रिलपासून कोरोना लसीची वर्धक (बुस्टर डोस) मात्रा दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याला ‘प्रिकॉशन डोस’ (खबरदारीची मात्रा) असे नाव दिले आहे.

हा डोस आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना विनामूल्य दिला जाईल, तर उर्वरित प्रौढांना पैसे द्यावे लागतील. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवर दिला जाईल. ज्यांनी दुसरा डोस ९ मासांपूर्वी घेतला आहे त्यांना हा डोस दिला जाणार आहे.