भारतात ‘कोरोना’चा संसर्ग झाल्यानंतर सरकारी यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे साधकाला आलेले कटू अनुभव

शासनाने कार्याच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग (खाती) करून त्या विभागावर त्या त्या कार्याचे दायित्व सोपवलेले असते; पण गोंधळ असा होतो की, या सर्व सरकारी खात्यांमध्ये कुठलाही समन्वय होत नाही. प्रत्येक खाते स्वतंत्रपणे कार्य करते. भारतात ‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर ‘जनता ‘कर्फ्यू’च्या दिवशी एक साधक एका ठिकाणाहून त्यांच्या गावी येऊन पोचले होते. त्यांची ‘कोरोना’ची चाचणी करण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभाग यांनी त्यांना अनेकदा बोलावले. सरकारच्या प्रत्येक दोन खात्यांतील समन्वयाच्या अभावामुळे ‘कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला त्याचा कसा त्रास झाला आणि होत आहे ? त्यात जनता अन् सरकार दोघांचाही वेळ आणि पैसा कसा वाया जात आहे ?’, हे पुढील लेख वाचल्यावर लक्षात येते.

१. एका ठिकाणाहून घरी येऊन १० दिवस झाल्यानंतर ‘कोरोना’ची चाचणी करण्यासाठी बोलावणे

‘मी एका ठिकाणाहून निघून २२.३.२०२० या दिवशी सकाळी ८.३० वाजता माझ्या गावी पोचलो. त्या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ होता. मला घरी येऊन १० दिवस झाल्यानंतर ३१.३.२०२० या रात्री १.३० वाजता तालुक्याच्या पोलीस ठाण्यातून घरी दूरभाष आला. पोलिसाने त्याची ओळख सांगून ‘तुम्ही कुठे आहात आणि कुठून आलात ?’, असे मला विचारले. त्यांनी विचारलेली सर्व माहिती मी त्यांना दिली. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘उद्या सकाळी ७ वाजता पोलीस ठाण्यात या. तुमची ‘कोरोना’ची चाचणी करायची आहे.’’ मी त्यांना ‘येतो’, असे सांगितले.

२. दोन सरकारी यंत्रणांत जाणवलेला समन्वयाचा अभाव

२ अ. पोलीस आणि सरकारी आधुनिक वैद्य यांच्यात ‘कोरोना’च्या चाचणीचे स्थळ अन् वेळ यांविषयी समन्वय नसणे : १.४.२०२० या दिवशी सकाळी ७ वाजता मी पोलीस ठाण्यात उपस्थित झालो. त्यानंतर साधारण १५ – २० मिनिटांनी ज्या पोलिसाने रात्री मला संपर्क केला होता, तो आला. त्याने मला पुन्हा ‘तुम्ही कुठून आणि कसे आलात ? कोणती आगगाडी होती ?’, असे विचारून माझे पूर्ण नाव आणि भ्रमणभाष क्रमांक इत्यादी सर्व माहिती विचारली. मी त्यांना ती सर्व माहिती दिली. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘तुमची ‘कोरोना’ची चाचणी करायची आहे. आधुनिक वैद्य इकडेच येत आहेत.’’ साधारण पाऊण घंटा तिथे थांबूनही आधुनिक वैद्य आले नाहीत; म्हणून आम्ही तेथून सरकारी रुग्णालयात गेलो. समवेत असलेल्या पोलिसाने तिकडे सेवेत (ड्युटीवर) असणार्‍या आधुनिक वैद्यांना ‘कोरोना’च्या चाचणीविषयी विचारले. त्यांनी ‘ते आधुनिक वैद्य १० वाजता येतील, तेव्हा या’, असे सांगितले. त्या वेळी साधारण सकाळचे ९.१५ वाजले होते.

२ आ. आधुनिक वैद्यांनी ‘केसपेपर’ करणे, केवळ थर्माेस्कॅनरने कपाळाचे तापमान नोंदवून घेणे आणि घरातच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) रहाण्यास सांगणे : मी सकाळी १० वाजता पुन्हा सरकारी रुग्णालयात गेलो. त्यांनी ५ रुपये घेऊन माझा ‘केसपेपर’ केला. त्यावर माझे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक लिहून घेतला. ‘चाचणी घेण्यासाठी स्वॅब (घशातील स्राव) घेतील’, असे मला वाटले होते; पण त्यांनी केवळ थर्माेस्कॅनरने माझ्या कपाळाचे तापमान नोंदवून घेतले (९८.३ डिग्री फॅ.) आणि ‘सर्दी-खोकला काही नाही ना ?’, असे विचारले. मी ‘नाही’ म्हणालो. नंतर त्यांनी घरातल्या घरात विलगीकरणाचा (‘होम क्वारंटाईन’चा) शिक्का माझ्या हातावर मारला आणि मला म्हणाले, ‘‘जा.’’ पोलिसांनी मला ‘घरीच रहा. बाहेर कुठे जाऊ नका’, असे सांगितले.

२ इ. दुसर्‍या दिवशी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावणे आणि ‘डी.एस्.पी.’नी पुन्हा सर्व माहिती विचारणे : दुसर्‍या दिवशी (२.४.२०२० या दिवशी) पुन्हा पोलीस ठाण्यामधून मला दूरभाष आला. त्यांनी मला ‘पोलीस ठाण्यात या. ‘डी.एस्.पी.’नी बोलावले आहे’, असे सांगितले. पुन्हा सकाळी ९ वाजता मी पोलीस ठाण्यात गेलो. ‘डी.एस्.पी.’नी पुन्हा माझी सर्व माहिती लिहून घेतली. त्यांनी माझ्या ‘आगगाडीचा क्रमांक, कुठे राहिलात ? कुठे बाहेर गेला होता का ?’ इत्यादी माहिती विचारली. नंतर त्यांनी मला ‘घरीच रहा’, असे सांगितले.

२ ई. जिल्ह्याच्या ठिकाणी अनुभवलेला अनागोंदी कारभार !

२ ई १. दोनच दिवसांनी जिल्ह्याच्या ठिकाणी ‘कोरोना’च्या चाचणीसाठी बोलावणे : त्यानंतर दोनच दिवसांनी (५.४.२०२० या दिवशी) त्यांनी मला पुन्हा बोलावले. तेव्हा त्यांनी ‘कोरोना’च्या चाचणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागेल’, असे मला सांगितले. तालुक्याच्या ठिकाणी माझी पुन्हा तपासणी करणार्‍या आधुनिक वैद्यांनी मला माझे नाव आणि पत्ता विचारला. नंतर ‘कुठून आलात ? सर्दी-खोकला किंवा अन्य काही होत आहे का ?’, असे मला विचारले. त्यांनी ‘कोरोना’च्या चाचणीसाठी’, असे मला लिहून दिले. त्यानंतर पोलीस मला रुग्णवाहिकेतून (ॲम्ब्युलन्समधून) जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेले.

२ ई २. जिल्ह्याच्या ठिकाणीही पुन्हा नव्याने तीच प्रश्नोत्तरे होणे आणि ‘कोरोना’ची चाचणी केली न जाणे : आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी पोचलो. त्यांनी मला रुग्णालयाच्या बाहेरच थांबायला सांगितले. तो ताप (‘फ्ल्यू’) येणार्‍या रुग्णांचा विभाग होता. त्यांनी तालुक्याच्या आधुनिक वैद्यांनी मला दिलेले ‘रेफरन्स पेपर्स’ घेतले नाहीत आणि पुन्हा माझी माहिती विचारली. त्यांनी माझे नाव संगणकात नोंदवून घेऊन त्याची एक छापील प्रत मला दिली आणि बाजूला बसलेल्या ‘या आधुनिक वैद्यांना दाखवा’, असे मला सांगितले. तेथील आधुनिक वैद्यांनी माझे तापमान पाहिले आणि पुन्हा मला ‘कफ, सर्दी-खोकला, डोकेदुखी यांपैकी काही आहे का ?’, असे विचारले.  मी ‘नाही’, असे सांगितल्यावर त्यांनी मला ‘घरीच विलगीकरणात रहा’, असे सांगून माझ्या ‘केसपेपर’वर ‘होम क्वारंटाईन’ असे लिहिले. त्यांनी माझी ‘कोरोना’ची चाचणी घेतलीच नाही. माझ्यासह तालुक्याहून आलेल्या दुसर्‍या व्यक्तीने ‘आमची ‘कोरोना’ची चाचणी घ्या. त्यासाठीच आम्हाला इकडे पाठवले आहे’, असे सांगितले, तरीही त्यांनी आमची ‘कोरोना’ची चाचणी घेतली नाही.

२ ई ३. ‘जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन एका घंट्यात ‘कोरोना’ची चाचणी करून परत जाऊ शकता’, असे सांगणे आणि प्रत्यक्षात तेथे गेल्यावर रुग्णवाहिका एका ‘लॉज’समोर एक घंटा उभी करून ठेवणे : ७.४.२०२० या दिवशी पुन्हा मला ‘कोरोना’च्या चाचणीसाठी बोलावले आणि ‘त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे आहे’, असे सांगितले. मी त्यांना विचारले, ‘‘या वेळी तरी नक्की चाचणी घेणार ना ? मागील वेळी घेऊन गेले आणि चाचणी घेतलीच नाही.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘या वेळी आपण एक घंट्यात चाचणी करून परत येऊया.’’ प्रत्यक्षात जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर आमची रुग्णवाहिका एका ‘लॉज’समोर एक घंटा उभी करून ठेवली होती. मी त्यात बसून होतो.

२ ई ४. फिरत्या रुग्णवाहिकेत चाचणीची सुविधा असूनही ताटकळत ठेवणे

२ ई ४ अ. एका व्यक्तीने ‘लॉज’वर रहाण्यास सांगितल्यावर तिला थोडी समज देणे आणि तेव्हा ‘कोरोना’ची चाचणी घेणारी फिरती रुग्णवाहिका इकडे बोलावतो’, असे तिने सांगणे : मी तालुक्याच्या पोलीस उपनिरीक्षकांना (‘पी.एस्.आय.’ना) लघुसंदेश पाठवला, ‘आम्हाला इथे एक घंटा थांबवून ठेवले आहे. गाडीत कुणीच येत नाही.’ त्यानंतर एक घंट्याने एक व्यक्ती आली आणि मला म्हणाली, ‘‘इकडे उतरा. तुम्हाला येथे ‘लॉज’मध्ये रहायचे आहे.’’ मी म्हटले, ‘‘आम्हाला ‘कोरोना’ची चाचणी करायला इकडे पाठवले आहे. इकडे ‘लॉज’मध्ये रहायला नाही. इकडे ठेवून आम्हाला ‘कोरोना’ झाला, तर त्याचे दायित्व कुणाचे ?’’ थोडे इंग्रजीमध्ये बोलून समज दिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘ठीक आहे. फिरत्या रुग्णवाहिकेत ‘कोविड’ची चाचणी घेतात. त्यांना इकडे बोलावतो. ते तुमची चाचणी घेतील. मग तुम्ही जा.’’

२ ई ४ आ. केवळ चाचणीसाठी नेऊन नंतर ‘लॉज’वर अलगीकरण कक्षात ठेवण्याचे नियोजन करणे : फिरत्या रुग्णवाहिकेत ‘कोविड’ची चाचणी करण्याची सुविधा असूनही त्यांनी मला ताटकळत ठेवले होते. ‘काय करायचे ?’, हे कुणालाच स्पष्ट नव्हते. ते एकमेकांना सतत संपर्क करत होते. ‘तालुका सरकारी रुग्णालय आणि जिल्हा सरकारी रुग्णालय यांच्यात समन्वय नव्हता’, असेही लक्षात आले. तालुक्याहून आम्हाला नेतांना ‘केवळ चाचणीसाठी नेतो’, असे म्हणाले आणि तिकडे गेल्यावर ‘लॉज’वर अलगीकरण कक्षात रहायला सांगितले’, म्हणजे ते एक प्रकारे खोटेच बोलत होते.

२ ई ४ इ. ‘कोरोना’ची चाचणी होणे : त्यानंतर फिरत्या रुग्णवाहिकेतील आधुनिक वैद्यांनी पुन्हा माझा ‘केसपेपर’ केला आणि पुन्हा माझी सर्व माहिती विचारून घेऊन नोंद केली. नंतर ‘कोरोना’ची चाचणी केली आणि ‘२ – ३ दिवसांत अहवाल येईल’, असे ते मला म्हणाले. येथून सर्व नमुने तपासणीसाठी दुसरीकडे पाठवले जात होते.’

२ ई ५. चाचणी केल्यावर त्याचा अहवाल येईपर्यंत तालुक्यातील एका वसतीगृहात रहाण्यास सांगणे आणि तेव्हा एका ठिकाणाहून घरी येऊन १७ दिवस झाले असल्याने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आणून देणे : इतके झाल्यावर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणाहून परत निघालो आणि संध्याकाळी ६.३० वाजता तालुक्याला पोचलो. तेथे पोचल्यावर त्यांनी मला एका वसतीगृहाकडे आणले आणि म्हणाले, ‘‘तपासणी अहवाल येईपर्यंत इकडे रहायचे.’’

तेव्हा मी त्यांना विनंती केली, ‘‘मला एका ठिकाणाहून येऊन आता १७ दिवस झाले आहेत. मी व्यवस्थित आहे. घरीही मी वरच्या माळ्यावर रहातो. कुठेही बाहेर जात नाही.’’ अशी बर्‍याच वेळा विनंती केल्यावर ‘आता रात्री घरी जाऊन सकाळी ९ पासून रात्री ८ पर्यंत इकडे वसतीगृहात रहा’, असे त्यांनी मला सांगितले. मला तेथे रहायला काहीच अडचण नव्हती; पण मला येऊन १७ दिवस पूर्ण झाले होते, म्हणजे माझा विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला होता.

२ ई ६. रुग्णवाहिकेत असतांना ६ – ७ घंट्यांच्या कालावधीत खायला किंवा प्यायला पाणीही न मिळणे, तेव्हा ‘अशा स्थितीत वृद्ध किंवा रुग्णाईत व्यक्तींचे किती हाल होत असतील ?’ असे वाटणे आणि त्यानंतर ‘तुम्ही घरीच रहा’, असा भ्रमणभाष  : येणेमी जवळजवळ ६ – ७ घंटे रुग्णवाहिकेत होतो. तेथे काही खायला किंवा प्यायला पाणीही नव्हते. जर वृद्ध व्यक्ती असती, तर ‘तिला किती त्रास होईल ?’, याची कल्पनाही करवत नाही. रुग्णवाहिकेची ‘सीट’ निघालेली आणि हलत होती, वातानुकूलनाची सुविधा असूनही वातानुकूलन यंत्र नादुरुस्त असल्यामुळे रुग्णवाहिकेत पुष्कळ उकडत होते. रात्री त्यांचा मला भ्रमणभाष आला, ‘‘तुम्ही घरीच रहा. काही असेल, तर बोलावतो.’’

‘ही केवळ देवाची कृपा होती’, असे मला वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले मला प्रत्येक क्षणी साहाय्य करत होते आणि तशी बुद्धी देऊन योग्य कृती करवूनही घेत होते.

२ उ. ‘प्रकृती कशी आहे आणि घरीच आहात ना ?’, हे विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अन् जिल्हा रुग्णालय येथून प्रतिदिन भ्रमणभाष येणे अन् शेवटपर्यंत चाचणीचा अहवाल न मिळणे : ८.४.२०२० ते २०.४.२०२० या कालावधीत प्रतिदिन मला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून भ्रमणभाष यायचे अन् ते प्रतिदिन मला माझ्या प्रकृतीविषयी विचारून ‘घरीच आहात ना ?’, असे विचारायचे. त्यांनी चाचणीच्या अहवालाविषयी मला काहीच कळवले नाही किंवा त्याचा अहवालही मला दिला नाही. त्याविषयी मी विचारल्यावर त्यांनी ‘१८.४.२०२० या दिवशी तुमचा विलगीकरणाचा कालावधी संपेल. तेव्हा अहवाल देऊ’, असे मला सांगितले; पण प्रत्यक्षात त्यांनी शेवटपर्यंत मला अहवाल दिलाच नाही. माझा मित्र तालुका रुग्णालयामध्ये आहे. त्याच्याकडून मी माझ्या अहवालाची माहिती मिळवली. नंतर एका स्थानिक आमदाराच्या ‘ट्वीट’वरून ‘तालुक्यातील लोकांच्या केलेल्या चाचण्यांचे सर्व अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत’, असे कळले.

२ ऊ. ‘पुन्हा ‘कोरोना’च्या चाचणीसाठी या’, असा भ्रमणभाष येणे : २०.४.२०२० या दिवशी पुन्हा तालुक्याहून मला भ्रमणभाष आला आणि ते म्हणाले, ‘‘कोविड’ची चाचणी घ्यायची आहे. उद्या तालुका रुग्णालयात दुपारी २ वाजता या.’’ मी विचारले, ‘‘पुन्हा चाचणी कशासाठी ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘२८ दिवसांनीही पुन्हा ‘कोरोना’ होऊ शकतो; म्हणून पुन्हा चाचणीसाठी या. या वेळी तालुक्यालाच चाचणी घेतो.’’ मी ‘ठीक आहे’, असे म्हटले.

२ ए. रुग्णालयात पोचल्यावर थांबवून ठेवणे आणि अहवालाविषयी विचारल्यावर ‘अहवाल पॉझिटिव्ह असला, तर न्यायलाच येतो’, असे दायित्वशून्य उत्तर देणे : २१.४.२०२० या दिवशी मी दुपारी २ वाजता रुग्णालयात पोचलो. तेव्हा पोलीस मला म्हणाले, ‘‘आता आधुनिक वैद्य जेवत आहेत. ‘तुम्ही २ वाजता नको. नंतर या’, असे मी म्हणालो होतो.’’ ते असे खोटे बोलले. नंतर ‘थोडा वेळ थांबा’, असे सांगून त्यांनी मला ३ वाजेपर्यंत थांबवले. त्यांनी चाचणी घेतली. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘या वेळी तरी मला माझ्या चाचणीचा तपासणी अहवाल कळवाल ना ?’’ तेव्हा त्यांनी ‘काळजी करू नका. अहवाल पॉझिटिव्ह असला, तर न्यायलाच येतो. कळवत नाही’, असे दायित्वशून्य उत्तर दिले.

२ ऐ. चाचणीनंतर १४ दिवस प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रतिदिन भ्रमणभाष येणे; पण या वेळीही अहवाल न देणे : नंतर २१.४.२०२० पासून ३.५.२०२० पर्यंत प्रतिदिन त्यांचा माझ्या प्रकृतीविषयी विचारपूस करायला मला भ्रमणभाष यायचा; पण या वेळीही त्यांनी मला तपासणी अहवाल दिला नाही. या वेळीही मी तालुका रुग्णालयातील माझ्या मित्राकडून अहवालाविषयी जाणून घेतले. रुग्णालयाने याविषयी मला काहीच कळवले नाही.

३. या सर्व प्रसंगात लक्षात आलेली काही सूत्रे

अ. रुग्णालयातील काही वैद्यकीय कर्मचारी ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी घातलेल्या कपड्यांमध्ये कामावर (ड्युटीवर) असतांना स्वतःचे छायाचित्र काढत होते.

आ. ‘मला एका ठिकाणाहून घरी येऊन १७ दिवस झाले आहेत’, असे सांगूनही त्यांनी माझी जिल्ह्याच्या ठिकाणी ‘कोरोना’ची चाचणी घेतली आणि त्या दिवसापासून पुढे विलगीकरणाचा कालावधी धरला. १.४.२०२० या दिवशी तालुका सरकारी रुग्णालयात माझ्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारला होता. त्याकडेही त्यांनी लक्ष दिले नाही किंवा त्या दिवसापासूनचा कालावधीही ग्राह्य धरला नाही.

४. साधनेची जाणवलेली आवश्यकता !

अ. खरोखरच एखादा रुग्णाईत असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, तर प्रशासनाच्या अशा वागणुकीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचेल किंवा त्याला शारीरिक त्रास होतील. त्यासाठी ‘वैद्यकीय कर्मचार्‍यांमध्ये ‘प्रेमभाव आणि इतरांना समजून घेणे’ हे गुण असणे किती आवश्यक आहे ?’, हे शिकायला मिळाले.

आ. ‘कोरोना’मुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मनातही भीती होती. त्यामुळे ‘प्रत्येकाला साधना शिकवणे किती आवश्यक आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.’

– एक साधक (२०.५.२०२०)

जनतेला विनाकारण त्रास दिल्याविषयी उत्तरदायी सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करा !

या लेखावरून पोलीस आणि आरोग्य खाते यांच्यामध्ये किती भोंगळ अन् दायित्वशून्य कारभार आहे, हेच दिसून येते. एखाद्या व्यक्तीला वारंवार तपासणीसाठी आणि पुनःपुन्हा तीच तीच माहिती विचारण्यासाठी बोलावणे, त्याला खाण्या-पिण्यास काही न देणे, त्याची कोणत्याही प्रकारची काळजी न घेणे, अशा प्रकारचा नाहक त्रास देणे कितपत योग्य ? त्या व्यक्तीला वारंवार तपासणीसाठी बोलावल्याने जर त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असता, तर त्याला उत्तरदायी कोण ? असे दायित्वशून्य आणि जनतेच्या जिवाची पर्वा न करणारे अधिकारी अन् संबंधित कर्मचारी यांना तात्काळ बडतर्फ करून कठोर कारवाई करा !