कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा वचननामा घोषित !
कोल्हापूर, ८ एप्रिल (वार्ता.) – थेट ‘पाईपलाईन’द्वारे घरोघरी गॅस पुरवठा, इलेक्ट्रिक बस, जिल्ह्यातील शेतमालाला उठाव देण्यासाठी ‘कार्गो हब’ (विमानाद्वारे शेतीमालाची वाहतूक) यांसारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवू. शहरातील वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांत सुधारणा करून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासह केंद्राच्या विविध योजना आणि त्याला लोकसहभागाची जोड यांद्वारे कोल्हापूर शहराचा विकास करू, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी भाजपचा वचननामा घोषित करण्यात आला. त्या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी माजी खासदार धनंजय महाडिक, महिला आघाडीच्या सौ. चित्रा वाघ, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांसह अन्य उपस्थित होते.