पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांना समष्टी संत घोषित केल्याच्या भावसोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) यांना सनातनच्या ११८ व्या समष्टी संत घोषित केल्याच्या भावसोहळ्याचे रामनाथी आश्रमातून कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘६ मार्च २०२२ या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) यांनी सनातनच्या ११८ वे समष्टी संतपद प्राप्त केल्याचे सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले. हे वृत्त ७ मार्च २०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन-प्रभात’मध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांची पुढील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये जाणवली आणि त्यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण होऊन पुढील सूत्रे जाणवली. 

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१. पू. रत्नमाला दळवी ताईंची विविध योगमार्गांनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर झालेली साधना 

कु. मधुरा भोसले

१ अ. पू. रत्नाताईंनी अचूक आणि परिपूर्ण कर्म केल्यामुळे त्यांची कर्मयोगांतर्गत समष्टी साधना झालेली असणे : कु. रत्नाताईमध्ये साधनेच्या आरंभापासूनच ‘परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ’ हा गुण प्रबळ असल्याचे जाणवले. या गुणामुळे तिच्याकडून सेवा नेहमी अचूक आणि परिपूर्ण होते. पू. रत्नाताईने अचूक आणि परिपूर्ण सेवा केल्यामुळे तिची प्रामुख्याने कर्मयोगानुसार समष्टी साधना चांगल्या प्रकारे झाली. त्यामुळे तिची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन तिने तरुण वयात संतपद प्राप्त केल्याचे जाणवले.

१ आ. पू. रत्नाताई यांच्या व्यक्तभावाचे रूपांतर अव्यक्त भावामध्ये झाल्यामुळे त्यांची भक्तीयोगातील उपासनाकांडाच्या अंतर्गत सगुणातून निर्गुणाकडे शीघ्रगतीने चालू असणे : कु. रत्नाताईमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती आधी पुष्कळ प्रमाणात व्यक्तभाव होता. गेल्या काही वर्षांपासून तिच्यातील व्यक्तभावाचे रूपांतर अव्यक्तभावात झाल्यामुळे तिच्या अंत:करणातील भावऊर्जा अप्रकट अवस्थेत आहे. त्यामुळे या ऊर्जेचे रूपांतर चैतन्यामध्ये शीघ्रतेने होऊन तिच्या साधनेची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे लवकर झालेली आहे. अशा प्रकारे पू. रत्नाताईची वाटचाल भक्तीयोगातील उपासनाकांडांतर्गत सगुणातून निर्गुणाकडे शीघ्र गतीने चालू आहे.

१ इ. पू. रत्नाताई यांनी ‘जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती आणि अचूक नियोजनकौशल्य’, या गुणांची जोपासना केल्यामुळे त्यांची ज्ञानयोगानुसारही व्यष्टी अन् समष्टी स्तरांवरील साधना परिपूर्ण होत असणे : पू. रत्नाताईमध्ये ‘जिज्ञासा’ हा गुणही प्रबळ आहे. या जिज्ञासेच्या पोटी ती सेवेतील अहवालांचा बारकाईने अभ्यास करून त्यातील बारीकसारीक चुका शोधून काढते. त्याचप्रमाणे ती समष्टी सेवा अधिकाधिक अचूक, परिपूर्ण आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न नियोजनबद्धरित्या करते. तसेच ती अंतर्मुख होऊन स्वत:च्या व्यष्टी साधनेचा आढावाही प्रामाणिकपणे घेते आणि त्यातील बारीकसारीक त्रुटी शोधून व्यष्टी साधनाही अचूक, परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ‘जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती आणि अचूक नियोजनकौशल्य’, या गुणांची जोपासना झाल्यामुळे पू. रत्नाताईची ज्ञानयोगानुसारही व्यष्टी आणि समष्टी स्तरावर परिपूर्ण साधना चालू आहे.

१ ई. पू. रत्नाताई यांनी गेल्या जन्मी ध्यानयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या अंतर्गत चांगली एकाग्रता साध्य होणे : पू. रत्नाताई जेव्हा आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या अंतर्गत ‘स्वत:वरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, प्रार्थना करणे आणि नामजपादी उपाय करणे’, असे प्रयत्न करत असते, तेव्हा तिच्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण त्वरित न्यून होऊन तिला पुष्कळ एकाग्रता साधता येते. पू. रत्नाताईने गेल्या जन्मी केलेल्या ध्यानयोगांतर्गत साधनेमुळे तिला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत चांगली एकाग्रता त्वरित साधता येते. या एकाग्रतेमुळे तिची व्यष्टी आणि समष्टी साधना अल्पावधीत पूर्ण होते.

१ उ. पू. रत्नाताईंची गुरुकृपायोगांतर्गत काळानुसार आवश्यक असणारी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील साधना चांगली झाल्यामुळे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती झालेली असणे : पू. रत्नाताई जेव्हापासून साधना करत आहे, तेव्हापासून तिचे व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत सर्व प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे होत आहेत. त्याचप्रमाणे तिच्याकडून स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू शोधून त्यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्नही अत्यंत मनापासून आणि चिकाटीने झाले आहेत. तिने संत आणि समष्टी म्हणजे साधक यांनी सुचवल्याप्रमाणे स्वत:मधील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन आणि स्वत:मध्ये सकारात्मक पालट करण्यासाठी कठोर प्रयत्न केले आहेत. तिने अनेक प्रसंगी तिच्याकडून झालेल्या समष्टी चुकांसाठी कठोर प्रायश्चित्तही घेतले आहे. त्यामुळे तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण न्यून होऊन तिच्यामध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी, जिज्ञासा, समर्पणभावाने, एकाग्रतेने आणि परिपूर्ण सेवा करणे, तत्त्वनिष्ठता, आज्ञापालन, स्थिरता, नम्रता, अंतर्मुखता इत्यादी गुणांमुळे तिच्यामध्ये दैवी गुणांचे संवर्धन झालेले आहे. तिची व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील गुणात्मक साधना पाहून तिच्यावर परात्पर गुरुदेवरूपी श्रीदत्तगुरु अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे तिची गुरुकृपायोगांतर्गत काळानुसार आवश्यक असणारी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील साधना चांगली झाल्यामुळे तिची शीघ्र आध्यात्मिक उन्नती झालेली आहे.

२. पू. रत्नमाला दळवी यांची विविध योगमार्गांनुसार झालेली साधना आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये विकसित झालेले दैवीगुण

२ अ. पू. रत्नमाला दळवी यांनी विविध योगमार्गांनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर कठोर साधना करून श्रीगुरूंचे मन जिंकल्यामुळे त्यांनी अल्पावधीत संतपद प्राप्त केल्याचे जाणवणे : पू. रत्नाताईने ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग यांच्या अंतर्गत व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवर चिकाटीने कठोर साधना करून श्रीगुरूंचे मन जिंकले आहे. त्यामुळे तिने अल्पावधीत संतपद प्राप्त केल्याचे जाणवले. खरोखरच ‘पू. रत्नाताई म्हणजे दैवी गुणरूपी रत्नांची खाणच आहे.’

३. पू. रत्नमाला दळवी यांनी संतपद प्राप्त केल्याच्या भावसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण

३ अ. महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथे सूक्ष्मातून वास करणारे विविध संत अन् ऋषिमुनी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आल्याचे जाणवणे : तिच्या भावसोहळ्याला महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथे सूक्ष्मातून वास करणारे विविध संत अन् ऋषिमुनी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आल्याचे मला जाणवले. त्यांनाही पू. रत्नाताईने संतपद प्राप्त करून जनलोकात स्थान मिळवल्याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

३ आ. ‘पू. रत्नमालाताईंनी दत्तस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करून त्यांचे मन जिंकल्यामुळे हरि आणि हर यांना अत्यानंद होऊन त्यांनीही पू. रत्नमालाताईंवर भरभरून कृपा केल्याचे जाणवणे : जेव्हा तिचे संतपद घोषित झाले, तेव्हा शिवलोकातील शिवभक्तांनी तिच्यावर पांढऱ्या रंगाची फुले आणि वैकुंठातील विष्णुभक्तांनी तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या यांनी पुष्पवृष्टी केल्याचे जाणवले. ‘पू. रत्नमालाताईने दत्तस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करून त्यांचे मन जिंकल्यामुळे हरि आणि हर यांना अत्यानंद होऊन त्यांनीही पू. रत्नाताईवर भरभरून कृपा केली’, असे मला देवाने सांगितले. यावरून ‘साधकांनी श्रीगुरूंचे मन जिंकले, तर ब्रह्मांडातील विविध  देवता आणि दैवी शक्ती यांची कृपा साधक किंवा संत यांना अनायास प्राप्त होते’, हे सूत्र शिकायला मिळाले.

३ इ. ‘एका गुरूंची कृपा संपादन केली, तर विविध योगमार्गांनुसार साधना आपोआप होणे’ आणि ‘एकै साधे सब सधै’, हे सूत्र पू. रत्नामालाताईंच्या संदर्भात कसे लागू झाले ?’, हे सूत्र पू. रत्नामालाताईंकडून शिकायला मिळणे : पू. रत्नाताईने गुरुकृपायोगांतर्गत सेवा अनेक वर्षांपासून मनापासून आणि चिकाटीने केल्यामुळे तिच्याकडून ज्ञान, भक्ती, कर्म आणि ध्यान या योगमार्गांनुसार संतपदाला पोचण्यासाठी आवश्यक असणारी साधना झाली. यावरून ‘एका गुरूंची कृपा संपादन केली, तर विविध योगमार्गांनुसार साधना आपोआप होते’, हे सूत्र शिकायला मिळाले. यावरून ‘एकै साधे सब सधै’, हे सूत्र पू. रत्नाताईच्या संदर्भात कसे लागू झाले ?’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.

३ ई. देवद आश्रमाभोवती लक्ष्मीलोकाचे वायूमंडल निर्माण होणे आणि पू. रत्नमालाताईला श्री महालक्ष्मीदेवीने तिच्याकडील सुवर्णाची नाणी देणे अन् पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याकडून तारक रूपाचे कार्य होण्यासाठी कमळ आणि मारक रूपाचे कार्य होण्यासाठी सुदर्शनचक्र दिल्याचे श्री महालक्ष्मीदेवीने सांगणे :  पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीदेवीनेच पू. रत्नमालाताईने संतपद प्राप्त केल्याची घोषणा केली. तेव्हा देवद आश्रमाच्या भोवती लक्ष्मीलोकाचे वायूमंडल निर्माण झाल्याचे जाणवले. सनातन-निर्मित श्री महालक्ष्मीदेवीच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन पांढरे शुभ्र हत्ती सोंडेमध्ये पुष्पमाळा घेऊन ते देवद आश्रमात आल्याचे जाणवले. तेव्हा एका हत्तीने पू. अश्विनी पवार आणि दुसऱ्या हत्तीने पू. रत्नमालाताई यांच्या गळ्यात दैवी पुष्पहार घातल्याचे जाणवले. त्यानंतर कमळामध्ये उभ्या असणाऱ्या श्री महालक्ष्मीदेवीच्या उजव्या बाजूला पू. अश्विनी पवार आणि तिच्या डाव्या बाजूला पू. रत्नमालाताई गळ्यामध्ये पुष्पहार घालून उभ्या असल्याचे जाणवले. या दोन्ही युवा संतांमध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यानंतर श्री महालक्ष्मीदेवीने तिच्या हातातून पडणारी काही सुवर्णाची नाणी पू. रत्नमालाताईला दिल्याचे दृश्य दिसले. त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मीदेवीने पू. अश्विनीताईंना त्यांच्या हातातील कमळ आणि सुदर्शनचक्र दिल्याचे जाणवले. याचा भावार्थ देवीने सांगितला की, ‘पू. अश्विनीताईंना दिलेल्या कमळामुळे त्यांच्याकडून तारक आणि सुदर्शनचक्र दिल्यामुळे मारक अशा दोन्ही स्वरूपांचे कार्य ईश्वरेच्छेने काळानुसार होणार आहे.’

३ उ. लक्ष्मीलोकातील सरोवरात दैवी पुष्पहार घातलेल्या पू. रत्नमालाताई आणि पू. अश्विनीताई यांचे प्रतिबिंब श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतिबिंब ज्या सरोवरात पडते, त्यामध्ये पडणे अन् तेव्हा श्रीविष्णूकडून प्रक्षेपित होणाऱ्या आपमय चैतन्यलहरी कार्यरत होणे : सूक्ष्मातून दैवी पुष्पहार घातलेल्या पू. रत्नमालाताई आणि पू. अश्विनीताई यांचे प्रतिबिंब श्री महालक्ष्मीदेवी ज्या सरोवरातील कमळामध्ये उभी होती, त्या सरोवरातील चैतन्यदायी जलामध्ये पडल्याचे जाणवले. त्यामुळे दोन्ही संतांमध्ये श्रीविष्णूकडून प्रक्षेपित होणाऱ्या आपमय चैतन्यलहरी कार्यरत झाल्या आणि त्यांचा श्रीविष्णूचे अंशावतार असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यातील सहभाग वाढल्याचे जाणवले.

३ ऊ. धनकुबेराने पू. रत्नमालाताईंना रत्नाने भरलेला एक सुवर्णकलश भेट देणे : त्यानंतर कुबेराने पू. रत्नमालाताईला  रत्नांनी भरलेला एक सुवर्णकलश भेट दिला. त्यामुळे या रत्नांमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध देवतांच्या तत्त्वलहरी पू. रत्नमालाताईच्या माध्यमातून सनातन संस्था आणि तिच्या संलग्न असणाऱ्या संस्था यांच्याकडे संक्रमित झाल्याचे जाणवले.

३ ए. कुबेर आणि श्री महालक्ष्मीदेवी यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेला धर्मकार्य करण्यासाठी धनाची कमतरता कधीही भासणार नसणे : कुबेर आणि श्री महालक्ष्मीदेवी यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेला धर्मकार्य करण्यासाठी धनाची कमतरता कधीही भासणार नाही. त्याचप्रमाणे सनातन संस्था आणि तिच्या संलग्न असणाऱ्या संस्था यांच्या आध्यात्मिक ऐश्वर्यात उत्तरोत्तर वृद्धी होणार असल्याचा आशीर्वाद कुबेर अन् महालक्ष्मीदेवी यांनी दिला.

३ ऐ. प.पू. दादाजी वैशंपायन, परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांनी पू. रत्नमालाताईंना लवकरात लवकर समष्टी सद्गुरुपद प्राप्त करून याच जन्मी मोक्ष प्राप्त करण्याचा शुभाशीर्वाद दिल्याचे जाणवणे : या संतसोहळ्याला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांची सूक्ष्मातून वंदनीय उपस्थिती असल्याचे जाणवले. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ठिकाणी श्रीदत्तगुरु, परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ठिकाणी श्रीविष्णु आणि परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांच्या ठिकाणी शिव यांचे मला सूक्ष्मातून दर्शन झाले. तिन्ही संतांनी पू. रत्नमालाताईला लवकरात लवकर समष्टी सद्गुरुपद प्राप्त करून याच जन्मी मोक्ष प्राप्त करण्याचा शुभाशीर्वाद दिल्याचे जाणवले. तेव्हा संतसोहळ्याच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्रीदत्तगुरूंचे तत्त्व प्रक्षेपित करणारा ‘चाफा’, श्रीविष्णुतत्त्वाने युक्त असणारे ‘चंदन’ आणि शिवतत्त्वाने भारित असणारा ‘कापूर’ यांचा दैवी सुगंध वातावरणात दरवळल्याचे जाणवले.

कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पू. रत्नमालाताईच्या संतसोहळ्याच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा होऊन तिची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली’, यासाठी मी श्रीगुरूंच्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक