हंगेरीकडून निर्बंधांकडे दुर्लक्ष करत रशियाकडून तेल खरेदीचा निर्णय

रशियाशी ‘रुबल’ चलनामध्ये व्यवहार करण्यास सिद्ध

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन

नवी देहली – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर अमेरिका, नाटो देश (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’) आणि युरोपीय देश यांनी रशियावर कठोर निर्बंध घातले आहेत. युरोपीय देश यापूर्वी मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चे तेल आणि गॅस यांची खरेदी करत होते; मात्र या निर्बंधांमुळे त्यांनी ते विकत घेणे बंद केले आहे. यामुळे या देशांना मोठ्या संकटाला सामारे जावे लागत आहे. यामुळेच हंगेरीने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वी रशियाने, ‘जर युरोपीय देशांना कच्चे तेल आणि गॅस हवा असेल, तर रशियाचे चलन ‘रुबल’मध्ये व्यवहार करावे लागतील’, असे स्पष्ट केले होते. हंगेरीने रशियाची ही अटही मान्य केली आहे. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये फूट पडल्याचे म्हटले जात आहे.

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, ‘जर रशियाने त्यांना रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले, तर तसे केले जाईल.’ अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुतिन यांनी अन्य देशांना रुबेलमध्ये व्यवहार करण्याची चाल खेळली होती. हंगेरीने घेतलेल्या या निर्णयामुळे ही चाल यशस्वी होत असल्याचे म्हटले जात आहे.