भाजपच्या आंदोलनानंतर प्रशासन जागे !
लोकप्रतिनिधींनी आंदोलन केल्यानंतर जागे होणारे प्रशासन सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई का करत नाही ? यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करून पाण्याची गळती, तसेच चोरी थांबवून नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत. – संपादक
संभाजीनगर – सिडको-हडकोतील २ लाख नागरिकांच्या हक्काचे १८ ते २३ एम्.एल्.डी. (दशलक्ष लिटर) पाणी प्रतिदिन कोण चोरते ? याचा शोध महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय १५ दिवसांत घेणार आहेत. याप्रश्नी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळाला ५ एप्रिल या दिवशी त्यांनी तसे आश्वासन दिले. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाणी चोरांचा शोध लागेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणेतील सुधारणेसाठी त्यांनी ९ कलमी कार्यक्रम घोषित केला.
सिडको-हडको येथील नागरिकांना ८-१० दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. त्यातही जलनिःस्सारण घाण पाणी येत असल्याने लोकांचे आरोग्य बिघडले आहे. त्याकडे कुणी लक्ष देत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी ४ एप्रिल या दिवशी भाजपच्या वतीने सिडको एन्-५ जलकुंभ आणि महापालिका प्रशासकांच्या बंगल्यासमोर लक्षवेधी आक्रोश आंदोलन करण्यात आले. या विषयावर विस्तृत चर्चेसाठी पांडेय यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली.
त्यात आमदार सावे म्हणाले, ‘‘नक्षत्रवाडीवरून शिवाजीनगर, हनुमाननगर, सिडको एन्-५ आणि एन्-७, हडकोतील नागरिकांसाठी ५३ एम्.एल्.डी. पाणी सोडले जाते. त्यापैकी फक्त ३० ते ३५ एम्.एल्.डी. जलकुंभात पोचते. हे १८ ते २३ एम्.एल्.डी. पाणी कुठे मुरते ? अशी चोरी होत असल्यानेच ४ दिवसांऐवजी ८-९ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो का ? यात उत्तरदायी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी.’’ ती पांडेय यांनी मान्य केली.
९ कलमी कार्यक्रम !
जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे, टँकरवर जी.पी.एस्, मीटर दुरुस्ती, नक्षत्रवाडी ते एन्-५ जलवाहिनीवर २ अधिकाऱ्यांची देखरेख, गळती आणि चोरी शोधणार, पाणी वितरणाची नोंदवही ठेवणार, दोषी अधिकाऱ्यांची उलचबांगडी अथवा कारवाई, वेळापत्रकात सुधारणा आणि जलनिःस्सारण दुरुस्ती