लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणार्‍या चीनला ‘नाटो’ लक्ष्य करणार !

‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग

ब्रुसेल्स (बेल्जियम) – अमेरिका, कॅनडा आणि बहुतांश युरोपीय देशांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या ‘नाटो’ म्हणजेच ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ या सैनिकी संघटनेने चीन हा संरक्षणाला आव्हान ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ‘नाटो’ने आता आशियातील अन्य देशांशी सहकार्याचे संबंध अधिक घनिष्ठ करण्याचे ठरवले आहे. चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.

स्टोल्टेनबर्ग पुढे म्हणाले की, रशियाच्या सैनिकी कारवाईचा जागतिक स्तरावर परिणाम होत असल्याने ‘नाटो’ एका परिषदेचे आयोजन करणार आहे. सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेतच एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या विदेशमंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये रशिया-युक्रेन संघर्षासमवेतच चीनचा वाढता दबदबा अन् जागतिक स्तरावर संरक्षण आणि लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणारी चिनी धोरणे, यांवरही चर्चा करण्यात येणार आहे.