जर्मनीने ३० वर्षांत गाठला महागाईचा उच्चांक !

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे देशाचा वृद्धीदर १.८ टक्केच रहाण्याची शक्यता !

बर्लिन (जर्मनी) – आधीच कोरोना महामारीच्या अनेक लाटांनी भयग्रस्त झालेला युरोप आता रशियाच्या आक्रमक भूमिकेमुळे गोंधळलेल्या स्थितीत दिसत आहे. युरोपातील सर्वांत समृद्ध राष्ट्र असणार्‍या जर्मनीत महागाईने ३० वर्षांचा उच्चांक गाठला आहे. कोरोना महामारी, तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीविषयी असलेली संभ्रमाची स्थिती यांमुळे जर्मनीत रहाण्याचा खर्च वाढला आहे.

देशाचा अनुमानित वृद्धीदर ४.८ टक्क्यांवरून तब्बल १.८ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता आहे, असे मत ‘आर्थिक तज्ञांच्या युरोपीय परिषदे’च्या मोनिका स्नित्झर यांनी ‘डॉयचा वेला’ या जर्मन वृत्तसंस्थेकडे व्यक्त केले. मार्च २०२२ चा महागाई दर हा गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असू शकतो. हा दर गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक असल्याचे ‘जर्मन फेडरल स्टॅटिस्टिक्स ऑफिस’ने म्हटले आहे