नवी देहली – देशात सध्या अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘या इलेक्ट्रिक स्कूटर्संना आग का लागत आहे ?’, याचे कारण इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारे आस्थापन ‘एथर एनर्जी’ने दिले आहे. त्याने म्हटले की, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे प्रमुख कारण त्यातील बॅटरी आहे. या स्कूटरमध्ये ज्या बॅटर्या आहेत त्या थंड हवामान असलेल्या देशांसाठी बनवलेल्या आहेत. अनेक आस्थापनांनी त्यांच्या स्कूटरसाठी लागणार्या बॅटर्या या परदेशातून आयात केल्या आहेत. या बॅटर्या भारतीय हवामानानुसार बनवल्या पाहिजेत. अशा बॅटर्या बनवण्याचे आम्ही ठरवले आहे. तसेच आस्थापनांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्यापूर्वी त्याची सामान्य रस्त्यांवर चाचणी केली पाहिजे.
केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश
ओला, ओकिनावा आणि प्योर ईव्ही या आस्थापनांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आतापर्यंत आग लागल्याचे दिसून आले आहे. याची केंद्र सरकारने नोंद घेतली असून डी.आर्.डी.ओ.ला चौकशीचा आदेश दिला आहे.